गुवाहाटी : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला २-१ असे नमविल्यानंतर रविवारपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय महिला सज्ज झाल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत भारतीय महिलांचा टी२० क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यामुळे आता ही मालिका जिंकण्यासाठी भारतीयांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ पहिल्यांदाच हुकमी सलामीवीर स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वामध्ये खेळेल. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त असल्याने संघाची धुरा स्मृतीच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. हरमनप्रीत मालिकेत खेळणार नसल्याने तिच्या आक्रमक फटकेबाजीची कमतरता भारतीयांना जाणवेल.
त्याचवेळी, मिताली राजच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा भारतीयांना होईल. तरी फलंदाजीमध्ये भारताची मुख्य मदार स्मृतीवर असेल. याशिवाय युवा सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरु शकते. त्याचप्रमाणे, गोलंदाजीत एकता बिष्ट, पूनम यादव, राधा यादव, अरुंधती रेड्डी व अनुजा पाटील यांच्यावर प्रमुख मदार असेल. दुसरीकडे, टी२० प्रकारात इंग्लंड महिला फॉर्ममध्ये असून त्यांनी गेल्या ५ टी२० सामन्यांपैकी ४ सामन्यांत भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या तिरंगी टी२० मालिकेत भारताने इंग्लंडला नमविले होते.
प्रतिस्पर्धी संघ :
भारत : स्मृती मानधना (कर्णधार), तानिया भाटिया, एकता बिष्ट, हर्लीन देओल, भारती फुलमाली, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांड्ये, अनुजा पाटील, पूनम यादव, मिताली राज, अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा, राधा यादव आणि कोमल झांझड.
इंग्लंड : हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमोंट, कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सोफिया डंकली, सोफी एक्क्लेस्टोन, जॉर्जिया एल्विस, अॅमी जोन्स, लॉरा मार्श, नताली साइव्हर, अन्या श्रुबसोल, लिसी स्मिथ, लॉरेन विन्फिल्ड आणि डॅनियल वॅट.
Web Title: Challenge to lift performance against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.