लंडन : माजी चॅम्पियन पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीत स्थान मिळवणे केवळ आता गणिताचे कोडे आहे. विश्वचषक स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवावा लागणार आहे.
पाकिस्तानची विश्वचषक स्पर्धेतील वाटचाल १९९२ च्या विश्वकप स्पर्धेप्रमाणे भासत होती, पण भारत इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आणि बुधवारी रात्री न्यूझीलंड संघ यजमान संघाविरुद्ध पराभूत झाला. त्यामुळे त्यांच्या आशा अधिक धुसर झाल्या.
आता पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तरच काही शक्य आहे. कारण पाकिस्तानने नाणेफेक गमावली आणि त्यांना क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले तर पहिला चेंडू खेळण्यापूर्वी त्यांचे आव्हान संपुष्टात आलेले राहील.
न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध ११९ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांचे ९ सामन्यांत ११ गुण आहेत, पण मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतरही त्यांचा नेट रन रेट पाकिस्तानच्या तुलनेत (+०.१७५) सरस आहे तर पाकिस्तानचा नेट रन रेट (-०.७९२) आहे.
आठ सामन्यांत नऊ गुणांसह पाचव्या स्थानी असलेला पाकिस्तान संघाला जर न्यूझीलंडला पिछाडीवर सोडायचे असेल तर त्यांना प्रथम फलंदाजी करीत ३५० धावा कराव्या लागतील आणि बांगलादेशला ३११ धावांनी पराभूत करावे लागेल किंवा ४०० धावा फटकावत ३१६ धावांनी पराभूत करावे लागेल. हे असामान्य समीकरण आहे.
दुसरीकडे संधी गमाविणारा बांगलादेश पाकविरुद्ध दमदार कामगिरी करीत चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी देण्यास उत्सुक आहे. १९९९ मध्ये बांगलादेशने तशी कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान व वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजयानंतर बांगलादेश संघ सातव्या स्थानी आहे. पराभूत झालेल्या सामन्यांतही बांगलादेशने लढवय्या खेळ केला.बांगलादेश स्टार अष्टपैलू शाकिबुल हसनच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
सामना : दुपारी ३ वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)
Web Title: The challenge of making the impossible impossible for Pakistan, today is the deciding match against Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.