मालिकेसह अव्वल स्थान वाचविण्याचे आव्हान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा वन डे आज

मिचेल स्टार्कचा मारा खेळण्याची डोकेदुखी, सूर्यावर असेल फोकस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 05:21 AM2023-03-22T05:21:57+5:302023-03-22T06:33:36+5:30

whatsapp join usJoin us
Challenge to save the top rank with the series, final ODI against Australia today | मालिकेसह अव्वल स्थान वाचविण्याचे आव्हान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा वन डे आज

मालिकेसह अव्वल स्थान वाचविण्याचे आव्हान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा वन डे आज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई : टीम इंडियाने मुंबईत विजय मिळविला तर ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणममध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने आता चेन्नई वन डेत बुधवारी मालिका विजेत्याचा निर्णय होईल. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जिवाची बाजी लावणार हे निश्चित. सामन्याचा निकाल  मालिकेतील विजेता ठरवेल शिवाय आयसीसीचा नंबर वन संघदेखील या सामन्याद्वारे निश्चित होणार आहे.

सध्या टीम इंडिया वन डेमध्ये अव्वल स्थानी आहे. चेन्नईमध्ये पराभूत झाल्यास अव्वल स्थान हिसकावले जाईल. ऑस्ट्रेलिया आणि भारताचे समान ११३ रेटिंग गुण होतील. पण कांगारू आघाडीवर असतील कारण ते सरासरीत टीम इंडियाच्या पुढे असतील. अशा  स्थितीत नंबर वन ताज वाचवायचा असेल, तर चेन्नईमध्ये विजय मिळविणे क्रमप्राप्त ठरेल. टीम इंडिया जिंकली तर  रेटिंग पॉइंट ११५ होतील तर ऑस्ट्रेलिया दोन स्थानांनी खाली घसरून चौथ्या स्थानावर पोहोचेल. अशावेळी न्यूझीलंड दुसऱ्या आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.
चेपॉकवर अनेक महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. मागील दोन्ही सामन्यांत सूर्याने खाते उघडले नव्हते. संघात श्रेयस अय्यर नसल्याने सूर्याला धावा काढाव्या लागतील. त्याला पुरेशी संधी दिली जात असल्याने स्वत:च्या क्षमतेला न्याय देण्याची जबाबदारी सूर्यावरच असेल. 

मागील दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांना क्रमश: ३६ आणि ११ अशी केवळ ४७ षटके टाकता आली. त्यामुळे रोहितने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घ्यावे असे गोलंदाजांना वाटत असावे.  शाार्दुल ठाकूर  की जयदेव उनादकट यांच्यापैकी कोण तसेच  रवींद्र जडेजासोबत कुलदीप यादव की अक्षर पटेल यापैकी कोण खेळू शकेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी मालिका खूपच रोमांचक बनवली आहे.  मिचेल मार्शने दोन्ही सामन्यांत एक डझनभर षटकार खेचून भारतीय गोलंदाजांची झोप उडवून दिली. त्याचे आव्हान परतवून लावण्याचे आव्हान असेल. स्टार्कचा सामना करतेवेळी  रोहित, विराट, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यांना अनुभव पणास लावावा लागणार आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर टीम इंडियाला अधिक मदत मिळू शकते कारण येथे फिरकीपटूंचे वर्चस्व असते. गेल्या दोन सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी होती, ज्याचा फायदा दोन्ही संघांनी घेतला. भारतीय फलंदाज मात्र संघर्ष करताना दिसले.
 

Web Title: Challenge to save the top rank with the series, final ODI against Australia today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.