अयाझ मेमन टी-२० मालिकेनंतर भारतासाठीन्यूझीलंडचा टी-२० दौरा हा बागेत फेरफटका मारण्यासारखा सोपा ठरेल, असे वाटत होते. मात्र, एकदिवसीय मालिकेच्या निकालानंतर परिस्थिती बदलली आहे. ३-० असा विजय हा यजमान संघाने पाहुण्या संघावर उगवलेला सूड होता. तसेच त्यांनी कसोटी मालिकेत भारताला मानसिक दबावाखाली देखील आणले. अर्थात मर्यादित षटकांचे क्रिकेट हे पाच दिवसीय खेळापेक्षा वेगळे आहे. कसोटीत खेळाडूंचे कौशल्य आणि मानसिकतेचा खरा कस लागतो. भारताने मर्यादित षटकांच्या सामन्यात ही गती गमावली आहे.
न्यूझीलंड इलेव्हन विरोधातील सराव सामन्यातील दोन दिवसांत कसोटी मालिकेत पुढे खेळणे भारतासाठी कठीण असू शकते, याची झलक दिसली. वेगवान गोलंदाजांना बाउन्स देणाऱ्या किवी खेळपट्टीवर भारतीय फलंदाजी अडचणीत येऊ शकते. भारताने सराव सामन्यात पहिल्या डावात २६३ धावा केल्या. विराट कोहली अंतिम ११ मध्ये नसला तरी भारतासाठी ही माफक धावसंख्या आहे. भारताला जी काही आघाडी मिळाली ती गोलंदाजांच्या जोरावर मिळाली. दोन दिवसांत भारतीय संघाच्या कसोटीत येऊ शकणाºया अडचणींवर प्रकाश पडला. सराव सामन्यात न्यूझीलंडचे विल्यमसन, टेलर, लॅथम, वॅटलिंग आणि बोल्ट यांसारखे प्रमुख खेळाडू नव्हते. कोहलीची मुख्य चिंता ही कसोटी सर्वोत्तम संयोजन शोधणे ही आहे. रोहित शर्मा जखमी झाल्याने मयांक अग्रवालचा सलामीचा साथीदार शोधावा लागणार आहे. पृथ्वी शॉ आणि शुभमान गिल हे दोन्ही संघात आहेत. सलामीची जोडी कसा खेळ करते, यावर स्थिती अवलंबून असेल. गोलंदाजी संयोजन निवडणे हे काहीसे सोपे आहे. अश्विन आणि जाडेजा हे नियमित फिरकीपटू आहेत. तर हनुमा विहारी हा देखील आॅफ स्पिनर आहे. परदेशातील कसोटी सामन्यात जाडेजाला आॅफ स्पिनरच्या पुढे होकार मिळाला आहे. भारतासाठी आनंदाची बाब म्हणजे एकदिवसीय सामन्यात निष्प्रभ ठरलेला बुमराह हा सराव सामन्यात अधिक अचूक होता. शमीही फॉर्ममध्ये आहे. तिसरा गोलंदाज उमेश यादव, सैनी किंवा इशांत असू शकतो. वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी प्रत्येक कसोटी सामन्याला ६० गुण दिले आहेत. एका विजयानेदेखील भारत वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळविण्याच्या दिशने पुढे जाईल.पुजारा आणि हनुमा विहारी या जोडीने भारताच्या फलंदाजीचा भार उचलला. याआधी देखील तो याच स्थानावर खेळला होता. शॉ याची दोन कसोटी शतके किंवा गिल याचा सहा महिन्यांतील शानदार फॉर्म पाहता विहारीला क्रमवारीत वर आणणे हा जुगार ठरेल. विहारीला पहिल्या किंवा दुसºया स्थानावर संधी मिळाली, तर मधल्या फळीत गिलपेक्षा पंतचे पारडे जड ठरू शकते.(लेखक लोकमतमध्ये कन्सल्टिंग एडिटर आहेत)