श्रीलंकेच्या महिला संघाची कर्णधार चमारी अटापट्टूने ( Chamari Athapaththu) वन डे क्रिकेटमधील वादळी खेळीची नोंद करताना शेन वॉटसन, महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली या दिग्गजांना मागे टाकले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने विजयासाठी ठेवलेल्या ३०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चमारीने एकटीने नाबाद १९५ धावांची स्फोटक खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३०१ धावा उभ्या केल्या. कर्णधार लॉरा वोलव्हार्डने १४७ चेंडूंत २३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १८४ धावा चोपल्या. लारा गुडॉल ( ३१), मॅरिझने कॅप ( ३६) व नॅडीन डे क्रेर्क ( ३५) यांची तिला साथ मिळाली. पण, आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर चमारी उभी राहिली. तिने १३९ चेंडूंत २६ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १९५ धावा केल्या आणि श्रीलंकेला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. निलाक्षिका सिल्वाने नाबाद पन्नास धावा केल्या. चमारी व निलाक्षिका यांनी १४६ चेंडूंत १७९ धावांची नाबाद भागीदारी केली.
- महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना चमारीने केलेल्या १९५ धावा या सर्वोत्तम ठरल्या. यापूर्वी २०१७ मध्ये मेग लॅनिंगने नाबाद १५२ ( वि. श्रीलंका) केल्या होत्या आणि कालपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करताना दीडशेपार धावा करणारी ती एकमेव महिला खेळाडू होती.
- महिलांच्या वन डे क्रिकेटमधील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. एमेलिया केरने २०१८ मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद २३२ धावा केल्या होत्या. त्याआधी १९९७ मध्ये बेलिंडा क्लार्कने डेनमार्कविरुद्ध नाबाद २२९ धावा केलेल्या. चमारीने काल भारताच्या दीप्ती शर्माचा १८८ धावांचा विक्रम मागे टाकला.
- वन डे क्रिकेटमध्ये ( पुरुष/महिला) धावांचा यशस्वी पाठलाग करतानाची ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. ग्लेन मॅक्सवेलने २०२३च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद २०१ धावा चोपल्या होत्या. चमारीने काल नाबाद १९५ धावा करून शेन वॉटसन ( १८५* वि. बांगलादेश, २०११), महेंद्रसिंग धोनी ( १८३* वि. श्रीलंका, २००५) आणि विराट कोहली ( १८३ वि. पाकिस्तान, २०१२) यांना मागे टाकले.
Web Title: Chamari Athapaththu's 195* is the highest score in Women's ODI history while chasing, Sri Lanka registered the highest successful chase in women's ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.