कोलंबो - ‘जसप्रीत बुमराह विशेष शैलीचा दमदार वेगवान गोलंदाज आहे. तो भारतासाठी प्रमुख खेळाडू असून, त्याने प्रदीर्घ कारकिर्दीसाठी प्रयत्न करावा, यासाठी त्याने सातत्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळू नये,’ असा सल्ला श्रीलंकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने बुमराहला दिला आहे. त्याचप्रमाणे, ‘भारतीय व्यवस्थापनाने बुमराहच्या कार्यभाराबाबतही योग्य नियोजन करावे,’ असे म्हटले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वासने म्हटले की, ‘बुमराहची गोलंदाजी शैली वेगळ्या प्रकारची आहे. अशा गुणवत्तेच्या गोलंदाजाला आपण सांभाळले पाहिजे. असे गोलंदाज सर्व प्रकारांत नाही खेळू शकत. योग्य प्रकार निवडून, त्यानुसार बुमराहला खेळविले पाहिजे.’ वासने यावेळी आगामी विश्वचषकात रोहित शर्मा भारतासाठी तडाखेबंद फटकेबाजी करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
वास म्हणाला की, ‘आपण सर्व जाणतो की, विराट कोहली खास खेळाडू आहे. तो गेल्या दशकभरापासून ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, ते अविश्वसनीय आहे. तोच नाही, तर रोहितची कामगिरीही असामान्य आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, रोहित विश्वचषकात भारतासाठी आपले पूर्ण योगदान देईल. सर्व चाहते या दोन खेळाडूंच्या फलंदाजीची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, दोघेही भारताकडून तळपतील.’ बुमराह सध्या शानदार कामगिरी करत आहे. दुखापतीमुळे दीर्घ काळानंतर त्याने संघात पुनरागमन केले आहे.
Web Title: Chaminda Vaas advises Jasprit Bumrah to play carefully for a long career
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.