लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘उमरान मलिकने आपल्या वेगाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. युवा गोलंदाज असल्याने त्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, पण तरी तो भविष्यात भारतासाठी शानदार गोलंदाज बनू शकतो,’ असा विश्वास श्रीलंकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने व्यक्त केला.
आयपीएलमध्ये सातत्याने १५० किमीहून अधिकच्या वेगान मारा करत उमरानने सर्वांचे लक्ष वेधले. यंदाच्या सत्रात त्याने आतापर्यंत २५ बळी घेतले असून २५ धावांत ५ बळी घेत त्याने आपला सर्वोत्तम मारा केला आहे. सांताक्रूझ येथील एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब येथे मुंबई क्रिकेट क्लबच्या नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी वास सध्या मुंबईत आहे. या वेळी त्याने त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘माझ्या मते उमरान दिवसेंदिवस प्रगती करत आहे. तो सातत्याने चांगली गोलंदाजी करत असून टी-२० क्रिकेटमध्ये अचूक मारा करणे महत्त्वाचे असते. तो भारतासाठी शानदार गोलंदाज बनेल. जर त्याला संधी मिळाली, तर जसप्रीत बुमराहसोबत उमरानची चांगली जोडी बनेल, असे मला वाटते.’
लंकेच्या खेळाडूंनी पाडली छाप
आयपीएलमधील लंकेच्या खेळाडूंच्या कामगिरीविषयी वास म्हणाला की, ‘श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. आयपीएलमध्ये चमकण्याचा त्यांना विश्वास आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण आहे तो वानिंदू हसरंगा. तो स्टार आहे. वानिंदूने श्रीलंका संघाकडूनही शानदार खेळ केला आहे. लंकेच्या इतर खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. या सर्वांच्या कामगिरीमुळे युवांमध्ये आत्मविश्वास वाढेल.’