नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्याच नावाची चर्चा आहे. पण भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतचे नाव चर्चेत आहे. कारण आयसीसीने उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार पंतला जाहीर केला आहे. हा पुरस्कार जाहीर केल्यावर आयसीसीने एक कार्टुन आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहे आणि हे कार्टुल चांगलेच वायरल झाले आहे.
2018 मध्येच कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या पंतने इंग्लंडमध्ये शतकी खेळी केली. इंग्लंडमध्ये शतक करणारा तो भारताचा पहिला यष्टिरक्षक ठरला. याशिवाय अॅडलेड कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 झेल टिपले. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. आयसीसी कसोटी क्रमवारीत पंतने 21व्या स्थानावर झेप घेतली. पंतने 2018च्या ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत दोन शतकांसह जवळपास 700 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पंत आणि यजमान संघाला कर्णधार टिम पेन यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. यावेळी पेनने माझ्या मुलांना सांभाळ, असे म्हटले होते. या वक्तव्यावर दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती. पेनच्या पत्नीसह ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही या गोष्टीची दखल घेतली होती. आयसीसीने आता हे कार्टुन काढत थोडीशी गंमत केली आहे.