Champion trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बराच कालावधी असला तरी यजमान पाकिस्तानने एक भीती व्यक्त केली आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी २०२४ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. अलीकडेच भारतात वन डे विश्वचषक पार पडला. खरं तर नियोजित वेळापत्रकानुसार २०२५ मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा पाकिस्तानात पार पडणार आहे. आगामी स्पर्धेचे यजमानपद सांभाळल्यास फायदा होईल की नाही याबद्दल शेजाऱ्यांना भीती आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आयसीसीला त्यांच्यासोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली.
तसेच राजकीय आणि सुरक्षेचे कारण सांगून भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भरपाई मिळायला हवी असे देखील पीसीबीने नमूद केले. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे, परंतु आयसीसीने अद्याप पीसीबीसोबत महत्त्वपूर्ण होस्टिंग करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे PCB अध्यक्ष झका अश्रफ यांनी आयसीसी कार्यकारी मंडळाची भेट घेतली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्याबाबत चर्चा केली.
ICC ने एकतर्फी निर्णय घेऊ नये - PCB माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दर्शवेल याबद्दल देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. तसेच आयसीसीने एकतर्फी निर्णय घेता कामा नये, अशी मागणी देखील त्यांनी केल्याचे कळते. पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील काही वर्षांमध्ये काही अव्वल संघांनी सुरक्षेचे कारण न सांगता पाकिस्तानचा दौरा केला आहे. पण, भारत आपल्या संघाला पाठवत नाही आणि त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातात. मग आयसीसीने याची नुकसानभरपाई पाकिस्तानला द्यायला हवी.
दरम्यान, यावर्षी पार पडलेल्या आशिया चषकाचे यजमानपद देखील पाकिस्तानकडे होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानात पाठवला नाही आणि टीम इंडियाचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले. पण, यजमान पाकिस्तानच्या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला, ज्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळवून आशियाई किंग्ज होण्याचा मान पटकावला.