Shubman Gill Winner Of The ICC Men’s Player Of The Month For February 2025 : टीम इंडियाचा प्रिन्स आणि चॅम्पियन उप-कॅप्टन शुबमन गिल फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं फेब्रुवारी प्लेयर ऑफ द मंथची नुकतीच घोषणा केली. शुबमन गिलशिवाय ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स शर्यतीत होते. या दोघांना धोबीपछाड देत शुबमन गिलनं या पुरस्कारावर आपलं नाव कोरले. महिन्याभरात गिलने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४.१९ च्या स्ट्राईक रेटसह १०१.५० च्या सरासरीने ४०६ धावा केल्या आहेत. यात इंग्लंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने दोन अर्धशतकासह एका शतकी खेळीचा समावेश आहे. आपला फॉर्म कायम राखत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दोन लढतीतही त्याने आपल्या बॅटिंगचा फर्स्ट क्लास शो दाखवून दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका गाजवली इंग्लंड विरुद्धच्या नागपूर वनडेत त्याच्या भात्यातून ८७ धावांची खेळी आली. त्यानंतर कटकमध्ये त्याने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अहमदाबादच्या मैदानात शुबमन गिलनं शतकी खेळी करून ही मालिका खास केली. इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात त्याने १०२ चेंडूंत ११२ धावांची खेळी केली होती. या शतकी खेळीत त्याने १४ खणखणीत चौकारासह ३ उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले होते.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही बॅट तळपली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत शुबमन गिलनं नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत त्याने ४६ धावा केल्या. या सामन्यात त्याचे अर्धशतक हुकले पण ही खेळी टीम इंडियाला विजयी सिलसिला कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरली.