भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. गांगुलीच्या रुपानं 65 वर्षांनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा कर्णधार विराजमान झाला आहे. गांगुलीच्या नियुक्तीनं भारतीय क्रिकेटला अच्छेदिन येतील अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि दहा महिन्यांच्या कार्यकाळात गांगुलीकडून त्यादृष्टीनं धाडसी निर्णयाची उत्सुकता आहे. अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत गांगुलीनं काही स्पष्ट संकेत दिले आहेत. गांगुली अध्यक्षपद स्वीकारताच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याचा फैसला होईल, असा ठाम विश्वास सर्वांना होता. गांगुलीनंही त्याचे संकेत देत मोठं विधान केलं.
कॅप्टन कूल धोनी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली आहे. शिवाय, आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही तो खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. धोनी निवृत्त कधी घेईल, याची माहिती निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद यांच्यासह कर्णधार विराट कोहली यांनीही देणे टाळले. पण, धोनीच्या निवृत्तीचा निर्णय गांगुली घेईल असेच सर्वांचे ठाम मत होते आणि आज अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्याबाबत स्पष्ट संकेत मिळाले.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान
धोनी हा सध्या 38 वर्षांचा आहे आणि त्यानं गांगुलीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघात त्यानं पदार्पण केले. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वन डे आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला, शिवाय त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीही उंचावली आहे. पण, सध्या त्याचा फॉर्म हरवला आहे, त्यामुळे त्याला निवृत्तीचा सल्ला दिला जात आहे. गांगुली म्हणाला,''चॅम्पियन्स कधीच संपत नाही. सध्या धोनीशी कोणतीच चर्चा झालेली नाही. पण, लवकरच त्याची भेट घेणार आहे आणि त्याच्याशी चर्चा करणार आहे. निवृत्तीचा निर्णय हा सर्वस्वी त्याचाच असेल. माझ्याबाबतीतही असेच घडलं होतं. जेव्हा जगाला वाटलं की माझा खेळ संपला, तेव्ही मी जिद्दीनं उभा राहिलो आणि त्यानंतर चार वर्ष खेळलो. चॅम्पियन्स इतक्या सहजासहजी हरवत नाहीत. त्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे मला माहित नाही.''
धोनीचा अभिमानगांगुली म्हणाला,''तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. भारताला त्याचा अभिमान आहे. त्यानं भारतीय क्रिकेटला काय दिलं, याचा जेव्हा तुम्ही हिशोब मांडता तेव्हा तुमच्या मुखातून Wow हाच शब्द येईल. जो पर्यंत मी या पदावर आहे, तोपर्यंत सर्वांचा आदर व्हायलाच हवा.''