Join us

स्वप्न 'वर्ल्ड क्लास'; पण नियोजन 'थर्ड क्लास'! नेटकऱ्यांच्या 'हास्यजत्रे'त पाकची उडली खिल्ली

सर्वोत्तम ड्रनेज व्यवस्थेच्या अभावामुळे पाऊस थांबल्यावरही मॅच पूर्ण करणं जमलं नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 10:33 IST

Open in App

Cricket Fans Troll PCB For Old Drainage System : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या स्पर्धेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत होते. एका बाजूला आयसीसीने दिलेल्या वेळेत स्टेडियम स्पर्धेसाठी सज्ज होणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मात्र बड्या बड्या बात करण्यात आल्या. आम्ही वर्ल्ड क्लास अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असा दावाही करण्यात आला. पण हा फक्त जुमला होता, हेच आता सिद्ध झाले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आधी पाक संघाची लाजिरवाणी कामगिरी, आता PCB च्या कारभारामुळे गेली लाज

गत चॅम्पियन्सचा रुबाब झाडणारा संघ साखळी फेरीतील एकही सामना न जिंकता बाद झाला अन् आता अर्ध्या तासांत पावसानेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची लायकी काढली. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महत्त्वपूर्ण सामन्यावर पावसाने पाणी फेरले. त्यानंतर मैदान सुकवण्यासाठी जी धडपड पाहायला मिळाली ती हास्यास्पद होती. 

अर्ध्या तासाच्या पावसानं बाजार उठला, यांनी तर फक्त पैसा ढापला 

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाक क्रिकेट बोर्डानं आपल्या चाहत्यांशी गद्दारी केल्याची गोष्ट चव्हाट्यावर आली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पीसीबीनं घरच्या मैदानावर रंगणाऱ्या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड क्लास अनुभूती देण्याचे वचन दिले होते. पण ही गोष्ट सत्यात उतरण्याऐवजी फक्त आयसीसीचा पैसा ढापण्याचं कामचं बोर्डाने केल्याचे दिसून येते. अशा आशयाच्या काही प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटताना दिसते. यामागच कारण आयसीसीने स्पर्धेच्या नियोजनासाठी पाक क्रिकेट बोर्डाला जवळपास १२०० कोटी एवढा निधी दिला होता. लाहोरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाऊस फार फारफार तर अर्धा तास झाला. पण सर्वोत्तम ड्रनेज व्यवस्थेच्या अभावामुळे पाऊस थांबल्यावरही मॅच पूर्ण करणं जमलं नाही. 

 बाता बड्या बड्या अन् नियोजन शून्य

कहर म्हणजे मैदान सुकवण्यासाठी स्पंजचा वापर करण्यात आल्याचेही काही फोटो व्हायरल होत आहेत. हा सीन पाक क्रिकेट बोर्डाची उरली सुरली लाज काढणारा ठरतोय. मैदान सुकवण्यासाठी कापसी पंज वापरण्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हास्यजत्राच भरवलीये. मैदान सुकवण्यासाठी स्टाफ सदस्यांनी केलेली कृती सोशल मीडियावर विनोदाचा विषय ठरताना दिसतोय. अनेक क्रिकेट चाहते वेगवेगळ्या मीम्स शेअर करत पाकची खिल्ली उडवत आहेत. बाता बड्या बड्या अन् नियोजन शून्य, या गोष्टीमुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची चांगलीच फजिती झाल्याचे दिसून येते. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५अफगाणिस्तानआॅस्ट्रेलियापाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तान