चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीसोबतच रवींद्र जडेजाच्याही वन डेतील निवृत्ती संदर्भात चर्चा सुरू होती. मात्र आता स्वतः जडेजानेच आपल्या निवृत्तीच्या चर्चांसंदर्भात मौन सोडले आहे.
यासंदर्भात रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, "अनावश्यक अफवा पसरवू नका. धन्यवाद." असे म्हटले आहे. गेल्या वर्षी भारताच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर जडेजाने टी-२० फॉरमॅटला अलविदा म्हटले होते. आता, ३६ वर्षीय जडेजाने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. या विश्वचषकासाठी अद्यात दोन वर्षे शिल्लक आहेत आणि तेव्हा जडेजा ३८ वर्षांचा असेल.रवींद्र जडेजाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील कामगिरीचा विचार करता, त्याने ३ डावांत फलंदाजी करताना केवळ २७ धावा केल्या आहेत. मात्र, या आकडेवारीवरून त्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे योग्य नाही कारण जडेजा आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. या स्पर्धेत त्याने ५ फलंदाजही बाद केले आहेत.
कर्णधार रोहित शर्मानेही दिला अफवांना पूर्णविराम -२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी, रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो, अशा बातम्या आल्या होत्या. रोहितने गेल्या वर्षीच टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. वन डेतील निवृत्तीसंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, "मी स्पष्ट करू इच्छितो की, मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाहीये. कृपया खोट्या अफवा पसरवू नका." याशिवाय, विराट कोहली पुढील २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळत राहील, अशा बातम्याही गेल्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. मात्र, यासंदर्भात अद्याप कसलीही पुष्टी झालेली नाही.