Join us

Champions Trophy स्पर्धेतील अफगाणिस्तान विरुद्धच्या बहिष्काराच्या मुद्यावर ECB नं स्पष्ट केली भूमिका

२६ फेब्रुवारीला रंगणाऱ्या या दोन देशांतील सामन्यात व्यत्यय निर्माण होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:54 IST

Open in App

Champions Trophy 2025 ECB Rejects call For Boycott of Afghanistan game:  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा सुटल्यावर आता या स्पर्धेत एका संघाला दुसऱ्या संघाविरुद्ध बहिष्कार टाकण्याची करण्यात आलेली मागणी चर्चेचा विषय ठरत आहे. इंग्लंडच्या संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा, या मागणीसाठी यूकेतील जवळपास १६० राजकीय नेते एकवटले आहेत. त्यामुळे २६ फेब्रुवारीला रंगणाऱ्या या दोन देशांतील सामन्यात व्यत्यय निर्माण होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणात इंग्लंड आणि क्रिकेट बोर्डानं आपली भूमिका स्पष्ट करत बहिष्कार टाकण्यासंदर्भातील विषय बाजूला ठेवल्याचे वृत्त समोर आले आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडनं मैदानात उतरु नये, अशी मागणी

राजकीय वातावरण तापल्यावर  इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.  जाणून घेऊयात इंग्लंड-अफगाणिस्तान यांच्यातील नेमकं  प्रकरण काय? इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका मांडलीये या संदर्भातील सविस्तर माहिती

काय आहे नेमकं प्रकरण? 

तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या पार्श्वभूमीवर आवाज उठवण्यासाठी यूकेतील राजकर्त्यांनी इंग्लंडच्या संघाला अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. संसदेतील १६० हून अधिक सदस्यांनी यासंदर्भात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला पत्र लिहून २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली आहे. तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींसोबतच्या भयावह वागणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही इंग्लंड पुरुष संघ आणि अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की, त्यांनी अफगाणिस्तान विरुद्ध खेळू नये, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाची भूमिका काय?

ESPN च्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड यांनी या राजकीय नेत्यांच्या पत्राला उत्तर देताना तालिनाबी राजवटीत महिला आणि मुलींना जी वागणूक दिली जात आहे त्याचा तीव्र निषेध केला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध द्विपक्षीय मालिकेसंदर्भात आपण ठाम भूमिका घेतली आहे. पण आयसीसी इवेंटमध्ये असं करता येणार नाही, यावर गोल्ड यांनी जोर दिला आहे. २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराची झालेली मागणी आणि त्यानंतर संघावर साखळी फेरीतून बाद होण्याची ओढावलेली नामुष्की याचा उल्लेखही गोल्ड यांनी केल्याचे दिसते. त्यामुळे इंग्लंडचा संघ आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकणार नाही, हे चित्र स्पष्ट होत आहे. यात आणखी काही ट्विस्ट पाहायला मिळणार का? ते येणारा काळच ठरवेल.

टॅग्स :इंग्लंडअफगाणिस्तानआयसीसीपाकिस्तान