भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रबळ दावेदार असला तरी न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाचे त्यांच्यापुढे फायनलमध्ये अवघड आव्हान असल्याचे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. भारताने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. अंतिम सामन्याआधी 'आयसीसी रिव्ह्यू'मध्ये बोलताना शास्त्री म्हणाले की, भारताला कुठला संघ हरवू शकत असेल तर तो न्यूझीलंड आहे. भारत दावेदार असला तरी त्याचा अधिक लाभ होणार नाही. २००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडने भारताला चार गडी राखून नमविले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हे आहेत गेम चेंजर...
फायनलचे चित्र पालटू शकणाऱ्या न्यूझीलंडच्या चार खेळाडूंची नावे शास्त्री यांनी घेतली. त्यात प्रतिभावान रचिन रवींद्र, स्थिर आणि शांतचित्त केन विल्यमसन, चाणाक्ष कर्णधार मिचेल सँटनर आणि एक्स फॅक्टर ग्लेन फिलिप्स यांचा समावेश आहे. विराटचा सध्याचा फॉर्म भारतासाठी लाभदायी ठरणार असून, निर्णायक क्षणी विल्यमसन न्यूझीलंडचा तारणहार ठरेल. दोघांनीही सुरुवातीच्या दहा धावा काढल्या तर ते दीर्घकाळ फलंदाजी करू शकतात. रवींद्र विविध स्ट्रोक्सच्या माध्यमातून प्रवाही फलंदाजी करतो. दुसरीकडे केन शांत राहून स्वतःच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करतो. त्याचे फुटवर्क फार चांगले आहे.सँटनरदेखील कर्णधार, फलंदाज आणि गोलंदाज म्हणून झपाट्याने प्रगती करीत आहे. फायनलमध्ये एखादा अष्टपैलू खेळाडू सामन्याचा मानकरी ठरेल. यासंदर्भात भारताकडून रवींद्र जडेजा किंवा अक्षर पटेल आणि न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स यांचे नाव सुचवू शकतो, असे भाकीतही शास्त्री यांनी केले आहे.
'टीम इंडियाच्या उणिवांचा फायनलमध्ये लाभ घेऊ'
भारताकडून साखळी सामन्यात झालेल्या पराभवातून चांगला धडा घेतला आहे. पराभवाचे शल्य असल्याने फायनलदरम्यान रोहितच्या संघातील उणिवांचा लाभ घेऊ, असे न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याने म्हटले आहे. यंगने डेवोन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांच्या सोबतीने न्यूझीलंडला अनेकदा चांगली सुरुवात करून दिली. ३२ वर्षांचा यंग म्हणाला, 'साखळीतील पराभवातून आम्ही धडा घेतला. भारतीय फलंदाजांचे खेळण्याचे तंत्र आम्ही समजून घेतले. त्यावर तोडगा काढण्यात यश मिळेल अशी अपेक्षा आहे. उभय संघांत झालेल्या अनेक रोमांचक सामन्यांचा मी साक्षीदार आहे. जो संघ रविवारी चांगला खेळेल तो जिंकेल. फायनलमध्ये दडपणातही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल.'