आगामी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानला मिळाले आहे. भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला तयार नाही. त्यात पाकिस्तानसमोर आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचं यजमानपद टिकवण्याचे मोठं आव्हान निर्माण झाले आहे. ही गोष्ट त्यांच्याच माणसाच्या मनातली आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकिस्तान संघ आपल्या घरच्या मैदानावर बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्टइंडीज या संघांसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. 21 ऑगस्टपासून बांगलादेश विरुद्धच्या मालिकेनं पाकिस्तानी क्रिकेटमध्ये परदेशी पाहुण्यांच्या मेजवाणीला सुरुवात होईल. याआधी पाकिस्तानचे माजी क्रिकेटर बसित अली यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह (PCB) देशाच्या सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे.
परदेशी संघ आपल्या देशात आल्यावर कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याचा थेट परिणाम आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर होईल. त्यामुळे पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाण्याची परिस्थितीही निर्माण होऊ शकते, असे बसित अली यांनी म्हटले आहे. आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी पाक बोर्डासह सरकारला खास संदेश दिला आहे. पाक माजी क्रिकेटर बसिल अली म्हणाले आहेत की,
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. बांगलादेशच्या दौऱ्यानंतर इंग्लंड आणि वेस्टइंडीजही संघही पाक दौऱ्यावर येईल. यावेळी आपल्याला सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर या काळात कोणतीही अनुचित घटना घडली तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाला त्याचा फटका बसेल. बलूचिस्तान आणि पेशावर येथे आपले जवान शहीद होत आहेत. यामागचं कारण काय? ते सरकारच सांगू शकते. यासारख्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.'
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मिनी वर्ल्ड कप स्पर्धा अशी ओळख असणारी आयसीसीची ही स्पर्धा २०१७ नंतर मोठ्या अंतराने आयोजित होत आहे. पाकिस्तानच्या संघ गत चॅम्पियन आहे. त्यांनी भारतीय संघाला पराभूत करून ही स्पर्धा जिंकली होती. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नाही. ते कोडं सोडवण्यासोबतच इतर संघांना सुरक्षिततेची हमी देण्याचं आव्हान पाकिस्तानसमोर आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर असही म्हणाला आहे की,
कोणतीही छोटी चूकही आपल्या अडचणी वाढवू शकते. त्यामुळे मोठा धोका टाळण्यासाठी ज्याप्रकारे आपल्याकडे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सुरक्षा पुरवली जाते त्याच दर्जाची सुरक्षा परदेशी संघांना देण्याची तयारी करावी. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यासंदर्भातील जागरुक असतील, अशी आशा बाळगतो.