क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जात असल्याने, क्रिकेट सामन्यांमध्ये कधी काय होईल, कोण बाजी मारून जाईल, याबाबत भले भले क्रिकेटतज्ज्ञही अनेकदा सावधपणे बोलतात. मात्र काही जणांना क्रिकेटबाबत भविष्यवाणी करण्याचा मोह आवरत नाही. पण अशांवर अनेकदा तोंडावर पडण्याची वेळ येते. महाकुंभमेळ्यातून प्रसिद्धीस आलेला आयआयटी बाबा अभय सिंह हा त्यापैकीच एक. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीबाबत आयआयटी बाबाने केलेल्या सर्व भविष्यवाण्या सपशेल चुकल्या होत्या. तसेच सामन्याच्या निकालानंतर आयआयटी बाबा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. मात्र या नामुष्कीनंतरही आयआयटी बाबाची भविष्य वर्तवण्याची खोड मोडलेली नाही. आता या बाबाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या लढतीच्या निकालाबाबत सूचक भविष्यवाणी केली आहे.
आयआयटी बाबाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या लढतीत कोण विजयी होईल, याबाबतचं भविष्य वर्तवलं आहे. मात्र यावेळी आयआयटी बाबाने फार काही न बोलता केवळ मोघम भविष्य वर्तवलं. आयआयटी बाबा सध्या जयपूरला असून, आज होत असलेल्या सामन्यात कोण जिंकेल, असं विचारलं असता आयआयटी बाबाने ऑस्ट्रेलिया, असं केवळ एका शब्दात उत्तर दिलं. बाकी काय होतं ते पुढे पाहू, असं उत्तर देऊन आयआयटी बाबाने तिथून बाजूला होणं पसंत केलं.
दरम्यान, याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीवेळी आयआयटी बाबाने केलेली भविष्यवाणी सपशेल चुकली होती. तसेच विराट कोहलीने दमदार शतक ठोकत आयआयटी बाबा अभय सिंह याची बोलती बंद करून टाकली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये उपांत्य लढत सुरू आहे. या लढतीमध्ये भारतीय संघाने फिरकी गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वेसण घातली आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ३० षटकांमध्ये ४ बाद १५८ धावा काढल्या होत्या.