Join us

वरुण चक्रवर्तीचा 'पंजा'! आता सेमीत टीम इंडिया घेणार ऑस्ट्रेलियाशी 'पंगा'

एकट्या वरुण चक्रवर्तीनं किवींचा अर्धा संघ केला गारद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 21:50 IST

Open in App

वरुण चक्रवर्तीचा 'पंजा' अन् त्याला अन्य भारतीय फिरकीपटूंनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर भारतीय संघानं न्यूझीलंडच्या संघाला २०५ धावांत आटोपले. या सामन्यातील विजयी हॅटट्रिकसह 'अ' गटातून अव्वलस्थानी झेप घेत टीम इंडियानं सेमीचं समीकरण  स्पष्ट केले आहे. आता ४ मार्चला भारतीय संघ दुबईच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 'पंगा' घेईल. दुसरीकडे ५ मार्चला दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लाहोरच्या मैदानात दुसरा सेमी फायनल सामना खेळवला जाईल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघानं वरुण चक्रवर्तीवर डाव खेळला, अन् तो यशस्वीही ठरला 

भारत-न्यूझीलंड या दोन्ही संघांनी 'अ' गटातून सेमीचं तिकीट पक्के केले होते. पण या सामन्यात जो जिंकणार तो ग्रुप टॉप करणार अन् सेमीत तो संघ ऑस्ट्रेलियाला भिडणार असे गणित होते. दुसरीकडे पराभूत संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाहोरच्या मैदानात उतरणार होता. या सामन्यात टॉस गमावल्यावर भारतीय संघावर पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली. श्रेयस अय्यरचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ९ बाद २४९ धावा केल्या होत्या. भारतीय संघ या धावांचा बचाव करेल का? असा प्रश्नही पहिला डाव संपल्यावर चर्चेत होता. कारण न्यूझीलंडचा संघ फिरकीला चांगला खेळतो. पण अखेरच्या टप्प्यात टीम इंडियानं वरुण चक्रवर्तीवर खेळलेला डाव किवींसाठी डोकेदुखी ठरला. केन विलियम्सन याने ८१ धावांची खेळी केली, पण ती कमीच पडली. कारण वरुण चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अर्धा संघ फसला. याशिवाय अन्य फिरकीपटूंनीही उत्तम गोलंदाजी केली अन्  न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २०५ धावांत आटोपला. 

केन विलियम्सन नडला, किवींचा अर्धा संघ एकट्या वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फसला   

भारतीय संघानं दिलेल्या २५० धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्यानं रचिन रविंद्र याच्या रुपात संघाला पहिला धक्का दिला. तो फक्त ६ धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर किवींनी ठराविक अंतरानं विकेट गमावल्या. एका बाजूला केन विलियम्सन तग धरून उभा होता. त्याने १२० चेंडूत ८१ धावांची खेळी केली. पण शेवटी अक्षर पटेलनं त्याचाही खेळ खल्लास करत न्यूझीलंडच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. हार्दिक पांड्याला मिळालेली एक विकेट सोडली तर उर्वरित ९ विकेट्स या भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. यात एकट्या वरुण चक्रवर्तीनं ५ जणांना तंबूत धाडले. कुलदीप यादवनं २ तर जडेजा आणि अक्षर पटेलनं एक-एक विकेट घेतली.

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ