Champions Trophy 2025 IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १ मार्च रोजी सामना होणार असल्याचे कळते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्याचे ठिकाण आणि तारीख निश्चित केली आहे. तसेच भारत विरूद्ध पाकिस्तान हा बहुचर्चित सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले. मात्र,अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपली भूमिका स्पष्ट केली नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १ मार्च २०२५ रोजी होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत खेळवली जाईल. १० मार्च हा राखीव दिवस असेल. ९ तारखेला होणाऱ्या अंतिम सामन्यात पावसामुळे अथवा अन्य कोणत्या कारणाने व्यत्यय आल्यास राखीव दिवशी हा सामना पार पडेल. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तयारी सुरू केली आहे.
माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना पाहण्यासाठी बार्बाडोसमध्ये होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) १५ सामन्यांचे वेळापत्रक पाठवले आहे. पीसीबीने दिलेल्या वेळापत्रकानुसार भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होतील. येथे कडक सुरक्षा व्यवस्था असेल अशी हमी पीसीबीने दिली आहे. लाहोर, रावळपिंडी आणि कराची या तीन ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होतील.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात
- अ गट - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश
- ब गट - ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान