Join us

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: भारत-पाक आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळणार; आयोजनाचा मार्ग मोकळा

दुसरीकडे, २०२७ पर्यंत भारतात होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तानदेखील भारतात खेळणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:47 IST

Open in App

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून भारत- पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला वाद अखेर शमला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण, भारत आपले सामने तटस्थ स्थळी खेळेल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली. दुसरीकडे, २०२७ पर्यंत भारतात होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तानदेखील भारतात खेळणार नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करू, असेही आयसीसीने गुरुवारी सांगितले. भारत आणि पाकिस्तानात २०२४ ते २०२७ या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाक एकमेकांच्या देशात खेळणार नाहीत. हे सामने तटस्थस्थळी खेळविले जातील, या प्रस्तावाला आयसीसी बोर्डाने मंजुरी प्रदान केली. ही व्यवस्था २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून (पाकिस्तान), पुढच्या वर्षी भारतात होणारी महिला विश्वचक स्पर्धा आणि २०२६ ला भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत लागू असेल.

भारताने सुरक्षेच्या कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला. भारताने २००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात एकही सामना खेळलेला नाही.

५० षटकांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन याआधी २०१७ ला ब्रिटनमध्ये झाले होते. २०२५ च्या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असेल. संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार असून दोन्ही गटांतील अव्वल दोन- दोन संघ उपांत्य सामने खेळतील.

आयसीसीच्या स्पर्धा

- चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तान 

- महिला विश्वचषक २०२५ भारत 

- पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ भारत- लंका 

- महिला टी-२० विश्वचषक २०२८ पाकिस्तान

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ