Pakistan Cricketers Hina Munawar, Champions Trophy 2025 | कराची : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापकपदी (संचालन) ( woman operations manager ) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका महिला पोलिस अधिकाऱ्याची निवड केली. नेमकी येथेच पाकिस्तानच्या खेळाडूंची अडचण झाली आहे. धार्मिक कारणांमुळे पुरुषांमध्ये स्त्रिया मिसळत नसल्याचे कारण देत खेळाडूंनी मात्र त्यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली.
हिना मुन्नवर असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून पाकिस्तान क्रिकेट संघासोबत नियुक्ती होण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही. याआधी त्या पाकच्या महिला क्रिकेट संघासोबत विदेश दौऱ्यावर जाऊन आल्या आहेत.
त्यांच्या नियुक्तीवर पाकिस्तानच्या पुरुष राष्ट्रीय संघात गंभीर चिंता निर्माण झाली असून एक महिला पुरुषांच्या क्रमवारीत कशी असू शकते, यावरून कुरकुर होत आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांसारख्या संघांमध्ये महिला फिजिओ, मीडिया मॅनेजर किंवा कोचिंग स्टाफमध्ये असणे ही सामान्य बाब आहे; परंतु पाकिस्तान क्रिकेटने अशा नियुक्तीला याआधी फारसे प्राधान्य दिलेले नाही. 'टेलिकॉम एशिया स्पोर्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, संघातील काही खेळाडू धार्मिकवृत्तीचे कडवट पालन करीत असल्याने ते महिलांसोबत संवाद साधत नाही.
महिला अधिकारी संघात असल्याने त्यांच्याशी संवाद कसा साधायचा, ही त्यांची मुख्य अडचण आहे. महिला सोबत असल्याने वैयक्तिक विषय आणि चर्चा करण्यावरही बंधणे येणार आहेत. कर्णधार मोहम्मद रिझवान आणि अन्य काही खेळाडू आंतरराष्ट्रीय सामना संपल्यानंतर टीव्हीला मुलाखती देतात त्यावेळी ते महिला अँकरकडे बघतही नाहीत.
मुन्नवर या सुरक्षातज्ज्ञ असून त्यांची यावर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तान महिला संघाच्या सुरक्षा व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली होती. या दौऱ्यात संघ कर्णधार बिस्माह महारूफ आणि गुलाम फतिमा यांनी परवानगी न घेता कॉफी शॉपला भेट दिली. यादरम्यान त्यांना अपघात झाला होता. त्यांनी संघ शिस्त मोडल्याचा ठपका मुन्नवर यांनी पीसीबीला दिलेल्या अहवालात ठेवला होता.
संघासोबत जुळल्या नाहीत
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तान संघ सरावात व्यस्त आहे. ८ फेब्रुवारीपासून त्यांना तिरंगी मालिका खेळायची आहे. दरम्यान, मुन्नवर यांनी आपली जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही. पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू त्यांची नियुक्ती कशा प्रकारे स्वीकारतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांनी दिले होते. चौकशी सुरू होताच बिस्माहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. तिच्या निवृत्तीमागे हे एक कारण असल्याचे सांगितले जाते. मुन्नवर यांना क्रिकेटचे फारसे ज्ञान नव्हते; पण त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील कामाच्या पद्धतीवर खुश होऊन पीसीबीने त्यांना संघ व्यवस्थापक म्हणून बढती दिली.
Web Title: Champions Trophy 2025 Pakistan Cricketers in trouble due to female manager Hina Munawar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.