Wasim Akram On Team India : सध्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत आणि अफगाणिस्तान या चार संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सुपर-८ मध्ये देखील जागा मिळवू शकला नाही. पण, पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शेजारील देशाने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का अशी चर्चा रंगली असताना माजी खेळाडू वसीम अक्रमने टीम इंडियाला भावनिक साद घातल्याचे दिसते. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे. पण, सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा भारताने आपला संघ शेजारील देशात पाठवण्यास विरोध दर्शवला.
आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र, बीसीसीआयने भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा आग्रह धरला. त्यानुसार भारतीय संघाने श्रीलंकेच्या धरतीवर सामने खेळून जेतेपद पटकावले. पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रम म्हणाला की, मला आशा आहे की, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येईल. आमचा संपूर्ण देश त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. क्रिकेट हा एक खूप चांगला खेळ असून, दोन्हीही देशांमध्ये लोकप्रिय आहे. आम्ही भारतीय संघाला चांगल्या सुविधा देऊ... याशिवाय नवीन मैदानांवर काम सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नवीन मैदान तयार करण्यासाठी झटत आहेत. लाहोर, कराची आणि इस्लामाबाद येथे हे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व देशांनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात यावे. क्रिकेट आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या बाजू असतात. अक्रम एका वृत्तवाहिनीशी बोलत होता.
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार
दरम्यान, भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका झाली नाही. २०१२ पासून हे कट्टर प्रतिस्पर्धी केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने असतात. २००७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा कसोटी सामना झाला होता.
वसीम अक्रमने आणखी सांगितले की, एकूणच सर्व काही तयार आहे. पाकिस्तानमधील सर्व नागरिक भारतीय संघाचे स्वागत करतील. आमचा संपूर्ण संघ टीम इंडिया, मान्यवर आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. मला आशा आहे की, भारतीय संघ आमच्या पाकिस्तानात किती चांगल्या सोयी आहेत हे अनुभवण्यासाठी येथे येईल.
Web Title: Champions Trophy 2025 People of Pakistan are waiting, team india should come to Pakistan says wasim Akram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.