चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान या इव्हेंटचा यजनाम आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच आयसीसीच्या या इव्हेंटचे आयोजन होत आहे. २०१७ मध्ये पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत ट्रॉफी जिंकली होती. आगामी इव्हेंटचे सामने पाकिस्तानातील तीन शहरांमध्ये खेळले जातील. मात्र, भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळेल. दरम्यान, इव्हेंटपूर्वीच श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने, भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांकडूनही धावांची आवश्यकता असेल, असे म्हटले आहे. तसेच, त्याने रोहित आणि विराटच्या फॉर्मसंदर्भातही भाष्य केले आहे.
काय म्हणाला मुथय्या? -एका कार्यक्रमादरम्यान पीटीआय व्हिडिओजला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुरलीधरन म्हणाला, "तो (विराट) एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. असे म्हटले जाते की, कौशल्य हे कायम स्वरुपाचे असते, तर फॉर्म कायमचा नसतो. यामुळे तो फॉर्ममध्ये येईल. रोहितने शतक ठोकले आहे आणि विराटही फॉर्ममध्ये येईल. या स्पर्धेत भारताला जिंकण्यासाठी तो फॉर्ममध्ये असणे आवश्यक आहे."
फिरकीपटूंची भूमिका महत्वाची ठरेल -मुरलीधरन पुढे म्हणाला, "उपखंडातील संघांकडे पाकिस्तान आणि यूएईतील परिस्थितीसाठी संतुलित आक्रमण असेल. फिरकीपटूंची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल. कारण पाकिस्तानातील विकेट फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरेल. अगदी युएईमध्येही. तो पुढे म्हणाला, "जगात बरेच चांगले फिरकी गोलंदाज आहेत, कारण जर तुम्ही भारताचा विचार केला तर संघात सुमारे चार फिरकी गोलंदाज आहेत आणि जर तुम्ही अफगाणिस्तानकडे पाहिले तर त्यांच्याकडेही चांगले फिरकीपटू आहेत. बांगलादेशकडेही आहेत. उपखंडातील प्रत्येक देशाकडे चांगले फिरकीपटू आहेत. महत्वाचे म्हणजे, 'भारताकडे अष्टपैलू आक्रमण आहे कारण त्यांच्याकडे चांगले फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजही आहेत. पाकिस्तानच्या बाबतीतही हेच आहे. अशा पद्धतीने उपखंडातील देशांकडे संतुलित आक्रमण आहे."