India vs Pakistan, Champions Trophy 2025 Jersey Controversy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर होणार आहे. म्हणजेच टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. याशिवाय इतर सर्व संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. यादरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने आपल्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिण्यास नकार दिल्याचा दावा काही वृत्तांमधून करण्यात आला होता. भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार की नाही, याबाबत अखेर बीसीसीआयने निर्णय घेतला आहे.
काय झाला अंतिम निर्णय?
सर्वसाधारणपणे सर्व संघांच्या जर्सीवर स्पर्धेच्या यजमानांचे म्हणजेच आयोजन करणाऱ्या देशाचे नाव असते. पण भारतीय संघ आपले सामने पाकिस्तानाच नव्हे तर दुबईत खेळणार होता. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता या मुद्द्यावर बीसीसीआयकडून मोठे वक्तव्य समोर आले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी बॅनरखाली होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना स्पर्धेच्या नावासोबत यजमान देशाचे नाव आणि स्पर्धेचे वर्ष लिहिणे बंधनकारक आहे. त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूला याची जागा असते. त्यानुसार, भारत आता जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिणार आहे.
बीसीसीआयकडून आले स्पष्टीकरण
बीसीसीआयचे नवे सचिव देवजीत सैकिया यांनीही आता चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान बीसीसीआय जर्सीशी संबंधित आयसीसीच्या प्रत्येक नियमाचे पालन करेल याची पुष्टी केली. म्हणजेच टीम इंडियाच्या जर्सीवर या स्पर्धेचे यजमानपद असलेल्या पाकिस्तानचे नाव लिहिलेले असणार आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या मीडियाने हा मुद्दा उपस्थित केला होता. बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता. पीसीबीलाही हा मुद्दा आयसीसीकडे नेण्याची इच्छा होती. पण बीसीसीआयने आता ही सर्व वृत्त फेटाळून लावली असून जर्सीशी संबंधित आयसीसीच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल असे सांगितले आहे.
Web Title: Champions Trophy 2025 team India will have Pakistan name printed on jersey after controversy as ICC Rules Clarifies BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.