चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एका बाजूला भारतीय संघ अन् दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड या दोन्ही संघाचा जलवा पाहायला मिळत आहे. आयसीसीच्या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या दोन्ही लढतीत या दोन्ही संघांनी मोठी कामगिरी करत सेमीच तिकीट पक्के केले आहे. न्यूझीलंडच्या संघानं बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकताच 'अ' गटातील दोन सेमीफायनलिस्ट पक्के झाले. या सामन्यात न्यूझीलंडच्या ताफ्यातील भारतीय वंशाच्या रचिन रविंद्र याने शतकी खेळीसह विश्वविक्रम प्रस्थापित केला. पण त्याला तगडी साथ देणारा टॉम लॅथमनंही मागे नाही. या पठ्ठ्यानंही वर्ल्ड रेकॉर्डचा डाव साधल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी सलग तीन वेळा 'भोपळा', आता फिफ्टी प्लसच्या हॅटट्रिकच्या पराक्रमासह साधला विक्रमी डाव
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी टॉम लॅथम धावांसाठी संघर्ष करताना दिसला. सलग तीन सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. पण या बॅडपॅचमधून सावरत आता सलग तीन सामन्यात त्याने ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीसह एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावे झालाय. सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्यावर पुढच्या तीन डावात सलग तीन वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम टॉम लथॅमन करून दाखवला आहे. अशी कामगिरी अन्य कुणाच्याही नावे नाही. त्यामुळे हा एक वर्ल्ड रेकॉर्डच आहे.
टॉम लॅथमनं मागील ६ डावात कुणाविरुद्ध कशी कामगिरी केली
टॉम लॅथम श्रीलंका, पाकिस्तान आण दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या वनडेत सामन्यात सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या दोन सामन्यात त्याच्या भात्यातून ५० पेक्षा अधिक धावा आल्या. यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच्या तिरंगी मालिकेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील ५६ धावांच्या खेळीसह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाक विरुद्ध केलेल्या ११८ धावाच्या नाबाद खेळीसह बांगलादेश विरुद्धच्या ५५ धावांचा समावेश आहे.
टीम इंडियासमोर त्याचा तोरा दिसणार की,....
न्यूझीलंडचा संघ २ मार्चला भारतीय संघाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना खेळताना दिसणार आहे. दुबईच्या मैदानात रंगलेला हा सामना ग्रुप टॉपर ठरवणारा असेल. या सामन्यात टॉम लॅथमसाठी टीम इंडिया काय रणनिती आखणार? त्याची जादू पुन्हा दिसणार की, टीम इंडियासमोर पुन्हा त्याच्यावर स्वस्तात माघारी फिरण्याची वेळ येणार ते पाहण्याजोगे असेल.