कराची - पाकिस्तानने २०२५ साली रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनुसार करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे भारताचे या स्पर्धेतील सामने यूएईमध्ये खेळविण्यात येऊ शकतील.
सामाजिक-राजकीय वातावरणामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिने भारत सरकारकडून भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. गेल्या वर्षीही पाकिस्तानच्या यजमानपदाखाली आशिया चषक स्पर्धादेखील हायब्रिड मॉडेलनुसार पार पडली होती. त्यावेळी भारताने अंतिम सामन्यासह आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डमधील (पीसीबी) एका विश्वसनीय सूत्राने माहिती दिली की, ‘भलेही भारत सरकारकडून भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्याची परवानगी मिळाली नाही, तरी पीसीबी कार्यक्रमामध्ये थोडा बदल करेल. कारण पूर्ण शक्यता आहे की, भारत आपले सर्व सामने शारजामध्ये खेळेल.’ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) स्वत: हून कोणत्याही बोर्डला आपल्या देशाच्या सरकारी सूचनांविरुद्ध जाण्यास दबाव आणू शकत नाही. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपला अंतिम निर्णय कधी जाहीर करणार, याकडे लक्ष लागले आहे.
पीसीबीकडून दबाव...आयसीसीचे काही वरिष्ठ अधिकारी पुढील आठवड्यात पुन्हा एकदा लाहोरचा दौरा करणार आहेत. त्यामुळे पीसीबी पुढील आठवड्यापर्यंत स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आयसीसीवर दबावही टाकत आहे. त्याचप्रमाणे, भारताने पाकिस्तानमध्ये आपला संघ पाठवावा, यासाठी आयसीसीने पुढाकार घ्यावा, यासाठीही पीसीबीकडून दबाव टाकण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वीच पीसीबीने आयसीसीला प्रस्तावित (संभाव्य) वेळापत्रक पाठविले होते. याच वेळापत्रकानुसार स्पर्धेची घोषणा करण्यासाठी आयसीसीकडे पीसीबीची मागणी. पीसीबीने प्रस्तावित केलेल्या वेळापत्रकानुसार १ मार्च २०२५ रोजी लाहोर येथे भारत-पाकिस्तान लढत रंगणार आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार सुरक्षेच्या कारणामुळे भारताचे सर्व सामने लाहोर येथेच खेळविण्यात येणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनासाठी कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथील स्टेडियम्सच्या नूतनीकरणासाठी पीसीबी सुमारे १३ अब्ज रुपये खर्च करत आहे.