कोलकाता, दि. 21 - भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या वन-डेत तीन चेडूंमध्ये तीन फलंदाजांना बाद करत हॅट्ट्रीक नोंदवली आहे. भारताने दिलेल्या 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची तगडी फंलदाजी भारताच्या गोलंदाजीपुढे ढासळली.
गोलंदाजांनी केलेल्या धारधार माऱ्याच्या जोरावर भारतानं दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी पराभव केला. 253 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजापुढे हे लक्ष डोंगराएवढे भासले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, चहल आणि कुलदिप यादव यांनी टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवातीला भुवनेश्वरनं दोन धक्के दिले. तर डावाच्या मध्ये चहलनं दोघांची शिकार केली. भुवनेश्वर, चहल आणि पांड्यानं ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले असताना त्यात भर म्हणून कुलदिपनं सलग तीन फलंदाजांना बाद करत त्यांच कंबरडेच मोडलं. 32 व्या षटकांतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर कुलदीपनं ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. हॅट्रिक घेताना कुलदीपनं अनुक्रमे मॅथ्यू वेड, अॅश्टन अगर आणि पॅट कमिन्स यांना बाद केलं. यापूर्वी 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 2014 मध्ये स्कॉटलंड संघाविरुद्ध खेळताना कुलदीपनं हॅटट्रीक घेतली होती.
भारताकडून हॅटट्रीक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी चेतन शर्मानं 1987 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तर कपील देवनं श्रीलंकेविरुद्ध 1991 मध्ये हॅटट्री घेतली होती.