केपटाऊन : कर्णधार विराट कोहलीच्या उपस्थितीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत नमवून पहिल्यांदा ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यास सज्ज आहे. दुसरा सामना गमविल्यानंतर मंगळवारपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय खेळाडूंना यजमान संघाविरुद्ध चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.
कोहलीच्या पाठीत दुखणे उमळल्याने जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. या सामन्यात मात्र तो खेळणार आहे. उभय संघ मालिकेत १-१ ने बरोबरीत असल्यामुळे यजमान संघदेखील मागील विजयापासून प्रेरणा घेण्यास उत्सुक असेल. अनेक तज्ज्ञांच्या मते, कोहलीने ऑफ ड्रॉइव्ह खेळताना सावध असायला हवे. रविवारी सरावाच्या वेळीही कोहली कव्हर ड्राइव्ह करताना दिसला.
ऋषभ पंत हा वेगवान गोलंदाजांना पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यात त्याला पुरेसे यश लाभू शकले नाही. न्यूलॅन्ड्सच्या गवताळ खेळपट्टीवर कॅगिसो रबाडा, डुआने ऑलिव्हर, लुंगी एनगिडी आणि मार्को जेन्सन यांचे चेंडू टोलविणे अवघड आव्हान असेल.भारताने केपटाऊनमध्ये कधीही सामना जिंकलेला नाही. विजयासाठी मधल्या फळीला आधीच्या तुलनेत अधिक दमदार कामगिरी करावी लागणार आहे. मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा पुजारा आणि रहाणे यांना संघात कायम ठेवले जाईल. मोठी सलामी भागीदारी देण्याची जबाबदारी लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्यावर असेल.
वेगवान ईशांत शर्मा कारकिर्दीत अखेरच्या टप्प्यात आहे. मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे बाहेर असलेल्या सिराजच्या जागी त्याला संधी मिळू शकेल. येथील खेळपट्ट्यांवर ईशांत हा यादवच्या तुलनेतही क्षमतावान ठरू शकेल. बुमराहकडून ही मोठी कामगिरी अपेक्षित आहे. एल्गर, दुसेन आणि बावुमा यांना बुमराहचा मारा खेळताना फारसा त्रास जाणवला नव्हता.
कोहली ९९ वी कसोटी खेळणार असून याच दिवशी त्याच्या मुलीचा वाढदिवसही आहे. मागील काही दिवसांपासून फ्लॉप खेळीमुळे दडपणाखाली असलेल्या विराटला अविस्मरणीय खेळी करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेत तीन दशकात पहिल्यांदा मालिका जिंकल्यास कोहलीच्या नावाची गणना भारताच्या महान कर्णधारांमध्ये होऊ शकेल. यासाठी फलंदाजांना स्थिरावून धावा काढाव्याच लागतील.
पहिल्या डावात ३०० हून अधिक धावा निर्णायक ठरू शकतील. भारतीय संघात कोहलीसह काही चेहरे असे आहेत की, ज्यांची उपस्थिती मानसिक लाभ मिळवून देणारी ठरते. दोन वर्षांपासून कोहली शतक झळकावू शकलेला नाही, मात्र त्यांची उपस्थिती आक्रमकतेचा संचार होण्यास पुरेशी ठरते. विराटसाठी हनुमा विहारीला बाहेर बसावे लागेल.
भारत: विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, जयंत यादव, प्रियांक पांचाल, उमेश यादव, हनुमा विहारी आणि ईशांत शर्मा.
दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), तेम्बा बावुमा, कॅगिसो रबाडा, सरेल इरवी, ब्युरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, कीगन पीटरसन, रासी वेन डेर डुसेन, काइल वेरेने, मार्को जेनसन, ग्लेनटन स्टुरमॅन, प्रेनेलन सुब्रायेन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुआने ऑलिव्हर.