भारतीय महिला संघानं सोमवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश संघाचा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. टीम इंडियाच्या महिलांच्या कामगिरीचे कौतुक होत असताना मंगळवारी भारताच्या एका पोरीनं वन डे सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या दहाच्या दहा फलंदाजांना माघारी पाठवून धमाल उडवली. इतकेच नव्हे तर तिनं फलंदाजीतही सर्वाधिक धावा करताना संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे ( बीसीसीआय) आयोजित 19 वर्षांखालील मुलींच्या वन डे संघात हा करिष्मा झाला. चंदिगड संघाची कर्णधार काश्वी गौतमनं ही अष्टपैलू कामगिरी केली. चंदिगड संघाने नाणेफेक करून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 50 षटकांत 4 बाद 186 धावा केल्या. सिम्रन जोहलने 81 चेंडूंत 42, मेहूलने 71 चेंडूंत नाबाद 41 धावा केल्या. काश्वीनं 68 चेंडूंत 6 चौकारांसह 49 धावांची खेळी करताना संघाला 186 धावांचा पल्ला गाठून दिला.
प्रत्युत्तरात अरुणाचल प्रदेशचा संघ 8.5 षटकांत 25 धावांत तंबूत परतला. चंदिगड संघानं 161 धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे फलंदाजीत अमुल्य योगदान दिलेल्या काश्वीनं गोलंदाजीत कहर केली. तिनं 4.5 षटकांत 1 निर्धाव षटक टाकून 12 धावांत अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ माघारी पाठवला.