Join us  

क्रीडाक्षेत्रात मुलींविषयी मानसिकता बदला- पूजा शेलार

क्रीडाक्षेत्रात मुली चमकदार कामगिरी करीत आहेत. मात्र, काही पालकांची अजूनही मुलींना खेळासाठी मैदानात उतरवण्याची मानसिकता नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:08 AM

Open in App

क्रीडाक्षेत्रात मुली चमकदार कामगिरी करीत आहेत. मात्र, काही पालकांची अजूनही मुलींना खेळासाठी मैदानात उतरवण्याची मानसिकता नाही. पालकांनी ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे मत भोसरीतील शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या कबड्डीपटू पूजा शेलार हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मुलींसाठी स्वतंत्र क्रीडा अ‍कॅडमी सुरु करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. शिवछत्रपती पुरस्कार मिळाला म्हणून मी शांत बसणार नाही. राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवण्याचे माझे ध्येय असल्याचे पूजाने नमूद केले.पूजा शेलार म्हणाली, ‘‘माझे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. शालेय जीवनापासून मी कबड्डीला झोकून दिले आहे. पाच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये मी सहभाग घेतला. या खेळांमधील कामगिरीच्या आधारे मला राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कबड्डी माझे आयुष्य बनले आहे. त्याची पावती म्हणूनच मला उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून राज्य शासनाकडून शिवछत्रपती पुरस्कार मिळाला.पुरस्कारामुळे खऱ्या अर्थाने माझ्या खेळाचे आणि माझ्या आई-वडिलांनी आजवर घेतलेल्या कष्टाचे चीज झाले आहे. मी लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाले आहे. पुरस्कार मिळाल्याचा जेवढा आनंद आहे तेवढेच दडपणदेखील वाढले आहे. जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हाच कबड्डी खेळाच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प मी मनोमन केला. क्रीडा प्रबोधिनी, महेशदादा स्पोटर््स फाउंडेशनचा मोठा वाटा माझ्या यशात आहे. मला या पुरस्कारापर्यंत पोहोचविण्यासाठी माझ्या आई-वडिलांचे मोठे योगदान आहे. त्या दोघांनीही मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. डाएटपासून सरावापर्यंत सर्वकाही आई-वडील डोळ्यात तेल घालून पाहतात. जिथे स्पर्धा असेल, तिथे माझी कामगिरी पाहण्यासाठी माझे वडील हजर असतात. खेळाला, सरावाला कितीही उशीर होवो, ते माझ्यासोबतच राहतात. घरची हलाखीची परिस्थिती असताना त्यांनी आम्हाला कुठल्याही बाबतीत काहीही कमी पडू दिले नाही. आम्हा दोघी बहिणींना ते मुलगाच मानतात. मुलगा झाला नाही म्हणून त्यांनी त्यांच्यातील खेळाची आवड कमी होऊ दिली नाही, हे विशेष. आमच्या माध्यमातून का होईना ते त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत आहेत आणि त्यांचे हे स्वप्न साकारण्यासाठी मी आजवर मेहनत घेतली आणि यापुढेही घेत राहणार आहे. सरावामध्ये सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळतेच हा माझा अनुभव आहे. मी नित्यनियमाने सकाळी साडेआठ ते साडेदहा जीमला जाते. डाएट, फिटनेसकडे लक्ष पुरवते. प्रोटिनयुक्त आहारावर माझा भर असतो. संध्याकाळी सहा ते नऊ असा दररोज तीन तास कबड्डीचा सराव करते.पूजा म्हणाली, ‘‘खरे तर मुलींच्या बाबतीत क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले जात नाही. क्रीडा क्षेत्रामध्ये खूप संधी आहे. मुलींना मैदानात उतरविण्याची मानसिकता नसते. कबड्डीच्या बाबतीत तर ही नकारात्मकता जास्त आहे. मात्र, पालकांनी ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपणही ही मानसिकता दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कबड्डी हा खेळ असा आहे की, यासाठी कोणताही आर्थिक खर्च लागत नाही. कोणतेही क्रीडा साहित्य घ्यावे लागत नाही. विनाखर्चाचा हा खेळ आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या मुलींनीही या खेळाबाबत विचार करायला हवा. मुलींमधून अधिकाधिक खेळाडू तयार व्हावेत यासाठी स्वतंत्र क्रीडा अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचे माझे ध्येय आहे. शिवछत्रपती पुरस्कार मिळाला म्हणून मी शांत बसणार नाही. राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवण्याचे ध्येय आहे.’’ ‘‘माझे चुलते, वडील सर्वांनाच क्रीडा क्षेत्राची आवड आहे. माझे वडील शंकर शेलार हे महापालिका सेवेमध्ये वाहनचालक या पदावर कार्यरत आहेत. आई प्रभावती या गृहिणी आहेत. वडिलांना कुस्ती व कबड्डी खेळाची प्रचंड आवड आहे. मोठी बहीण योजना व मी अशी दोनच अपत्ये त्यांना आहेत. मुलगा नसल्यामुळे त्यांची क्रीडा क्षेत्राची आवड आमच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. मोठी बहीण योजना हिलाही कबड्डीची आवड आहे. तिने अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्याने तिला पुढे खेळता आले नाही. मी मात्र कबड्डीचे मैदान सोडले नाही.’’

टॅग्स :क्रिकेट