Join us  

अश्विन अंतिम अकरामध्ये खेळायलाच हवा: चॅपेल

आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विनच्या समावेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 7:22 AM

Open in App

नवी दिल्ली : आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विनच्या समावेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यासंदर्भात ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चॅपेल म्हणाले की, ‘भारतीय संघाने अश्विनला अंतिम संघात स्थान द्यायला हवे.’ मधल्या फळीत काही बदल करून जर अश्विन अंतिम अकरामध्ये खेळला तर त्याचा संघाला निश्चितच फायदा होईल. कारण अश्विनने प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:ची कामगिरी उंचावत संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे तो अंतिम संघात नक्कीच खेळायला हवा. भारतीय संघाची फलंदाजी बलाढ्य आहे. भारतीय संघाकडे असलेल्या राखीव खेळाडूंचा दर्जा हा प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनात धडकी भरवणारा आहे. 

इंग्लंडमध्ये भारतीय संघाने अश्विनपेक्षा रवींद्र जडेजाला पसंती दिली होती. मात्र जडेजा, अश्विन, पंड्या, पंत हे असे खेळाडू आहेत की ते संघात असले की त्यांचा संघाला निश्चितच फायदा होतो.

तर तीन वेगवान गोलंदाजांना खेळवू शकतो

इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल टेस्टमध्ये भारताने जडेजाला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. जर या जागेवर जडेजाने स्वत:ला उपयुक्त सिद्ध केले तर मला वाटते भारताला केवळ एका फास्ट बॉलिंग ऑलरांउडरची गरज उरेल. ती कमी हार्दिक पंड्या पूर्ण करू शकतो. तर शार्दुलच्या रूपात अजून एक पर्यायही भारताला उपलब्ध झालेला आहे. भारतीय संघात जर जडेजा, पंड्या, अश्विन हे खालच्या क्रमांकावर खेळणारे ऑलराऊंडर असले तर भारत तीन वेगवान गोलंदाजांना निश्चितच खेळवू शकतो. 

अशा संतुलित संघामुळे भारताला आगामी स्पर्धांमध्ये मोठ्या धावांचे मोठे लक्ष्य न उभारताही विजय संपादन करता येईल. भारत आगामी स्पर्धांमध्ये विजयाचा प्रमुख दावेदार असेल. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआर अश्विन
Open in App