Join us  

गुणांचे खाते उघडण्यास चेन्नई, लखनऊ सज्ज

लखनऊचा कर्णधार लोकेश राहुल आणि स्टार सलामीवीर क्विंटन डीकॉक पहिल्या सामन्यात अपयशी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 5:09 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीचे सामने गमावल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स गुरुवारी विजय मिळवीत गुणांचे खाते उघडण्याच्या निर्धाराने ब्रेबॉर्न स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध भिडतील. दोन्ही संघांचे लक्ष यावेळी फलंदाजी सुधारण्यावर असेल. 

लखनऊचा कर्णधार लोकेश राहुल आणि स्टार सलामीवीर क्विंटन डीकॉक पहिल्या सामन्यात अपयशी ठरले. त्यामुळे चेन्नईविरुद्ध मोठी खेळी करण्यास दोघेही उत्सुक असतील.  मनीष पांड्ये आणि एविन लुईस यांच्या उपस्थितीत लखनऊची फलंदाजी मजबूत दिसते. मात्र, पहिल्या सामन्यात दोघेही अपयशी ठरले होते.  दीपक हुडा व आयुष बदोनी यांच्यासह कृणाल पांड्याने मधल्या फळीत दमदार योगदान दिल्याने लखनऊची फलंदाजी खोलवर असल्याचे दिसून आले. लखनऊला गोलंदाजीतही सुधारणा करावी लागेल. मधल्या फळीने चांगली धावसंख्या उभारून दिल्यानंतरही गुजरात टायटन्सविरुद्ध दुश्मंता चमीरा व आवेश खान फारसे प्रभावी ठरले नाहीत. रवी बोश्नोई, हुडा आणि कृणाल या फिरकीपटूंनाही अधिक मेहनत घ्यावी लागेल.

दुसरीकडे, चेन्नईची स्थितीही फारशी चांगली नाही. महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार रवींद्र जडेजा या अनुभवी फलंदाजांचा अपवाद वगळता ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबारी रायुडू आणि डीवोन कॉन्वे अपयशी ठरले होते. स्टार अष्टपैलू मोइन अलीच्या पुनरागमनाने चेन्नई संघाची बाजू बळकट झाली आहे. तसेच ड्वेन प्रिटोरियसही संघ निवडीसाठी उपलब्ध असेल.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनी
Open in App