Join us  

'कॅप्टन कूल' धोनी 2020च्या IPLमध्ये खेळणार की नाही? CSKनं दिलं उत्तर

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 12व्या मोसमातील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एक प्रश्न विचारण्यात आला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 4:17 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 12व्या मोसमातील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एक प्रश्न विचारण्यात आला... पुढील आयपीएलमध्ये तू खेळणार का? यावर धोनीनं काहीच न बोलता, स्मित हास्य दिले. त्याच्या या हसण्याचा अंदाज बांधणे अवघड आहे. पण, धोनी पुढील आयपीएल खेळणार की नाही या प्रश्नाने चाहत्यांच्या मनाला रुखरुख लागली आहे. धोनीचा फॉर्म पाहता त्यानं निवृत्ती घ्यावी असेही अनेकांचे मत आहे. पण, चेन्नई सुपर किंग्सनेच याचे उत्तर दिले आहे. 

चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनीही धोनी 2020च्या आयपीएलमध्ये खेळण्याची आशा व्यक्त केली आहे. धोनी पुढील हंगामातही चेन्नईचे नेतृत्व सांभाळेल आणि पुन्हा एकदा चेपॉकच्या चाहत्यांना आपल्या खेळाने मंत्रमुग्ध करेल, असा विश्वास कासी यांनी बोलून दाखवला. 

चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना धोनीनं दमदार कामगिरी केली आहे. त्याने यंदाच्या हंगामात 15 सामन्यांत 134.62 च्या स्ट्राईक रेटने 416 धावा केल्या आहेत. तरीही त्याच्या खेळीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कासी म्हणाले,''पुढील वर्षीही धोनी चेन्नईकडून खेळणार, आम्हाला तसा विश्वास आहे. गेल्या दोन वर्षांत त्याची कामगिरी चांगली झालेली नाही, असे बोलले जात आहे. मात्र, आकडेवारी पाहिल्यास त्याच्या बॅटीतून धावांची ओघ सुरूच आहे. त्याने गेल्यावर्षी 455 धावा केल्या होत्या. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याच्याकडून दमदार कामगिरी पाहायला मिळेल. तो नक्की पुनरागमन करेल.''   

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम लढतीत वॉटसनने 59 चेंडूंत 80 धावांची खेळी केली. मुंबईने विजयासाठी ठेवलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला एक धाव कमी पडली. मुंबईने त्यांना 7 बाद 148 धावांवर रोखले. मुंबईने किरॉन पोलार्डच्या ( 25 चेंडूंत नाबाद 41 धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर 8 बाद 149 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( 80 धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2019