MS Dhoni Last IPL 2022?: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( CSK vs KKR) असा हा सामना रंगणार आहे. पण, गुरुवारी महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. याआधीही टीम इंडियाकडून खेळताना धोनीनं असे आश्चर्याचे धक्के दिले, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचा टीम इंडियाला फायदा झाला. आता CSK च्या बाबतीतही तसेच होईल ही चाहत्यांना अपेक्षा आहे. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली CSK भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. याचा अर्थ MS Dhoniचा CSK सोबतचा प्रवास इथेच संपला, असा लावावा का?
२०२० च्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीचा खेळ पाहून त्याने निवृत्ती घ्यावी अशी चर्चा रंगली. आयपीएल इतिहासात प्रथमच CSK प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकली नाही आणि गुणतालिकेत तळाला राहिला. IPL 2020 च्या अखेरच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील शेवटचा सामना का?, असा प्रश्न विचारला, तेव्हा तो Definitely not असे म्हणाला होता. त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये त्याने CSK ला चॅम्पियन बनवून टीकाकारांची बोलती बंद केली. आता धोनीनं नेतृत्व सोडले आणि पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली.
महेंद्रसिंग धोनीनं चेन्नई सुपर किंग्ससाठी २०४ सामन्यांत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आणि त्यात १२१ विजय मिळवले, तर ८२ सामन्यांत हार मानावी लागली. त्याच्या विजयाची सरासरी ही ५९.६०% आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने २०१०, २०११, २०१८ व २०२१ मध्ये आयपीएल जेतेपदं पटकावली. याशिवाय त्यांनी ९ वेळा आयपीएल फायनल गाठली. CSK च्या नावावर २ चॅम्पियन्स लीगचे जेतेपदंही आहेत.
नीने CSK च्या भविष्याचा वाटचालीचा विचार करून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे धोनीचे आयपीएलमधील हे अखेरचे पर्व असेल का, अशी शंकेची पाल चुकचुकली आहे. याबाबत CSK चे CEO काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, तुम्ही धोनीबद्दल चर्चा करताय, तर तो नेहमी नियोजन करूनच चालतो. धोनी हा CSK महत्त्वाचा सदस्य आहे आणि कायम राहणार, मग तो कर्णधारपदी असो किंवा नसो... या पर्वात आणि यापुढेही तो चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पण, सूत्रांच्या माहितीनुसार धोनी या पर्वाच्या अखेरीस निवृत्ती घेऊ शकतो आणि संघाचा मेंटॉर म्हणून काम करू शकतो. पण, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.