चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभूत करून आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. आयपीएलचा सोळावा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून आणखी दोन सामन्यानंतर यंदाचा विजेता कोण असेल हे स्पष्ट होईल. चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर १ मध्ये गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. CSK च्या संघाने दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करून विक्रम नोंदवला आहे.
दरम्यान, फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईसमोर आता गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. शुक्रवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार असून यातील विजयी संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. काल झालेल्या सामन्यात मुंबईने ऐतिहासिक विजय मिळवत लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत केले. ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे.
खरं तर चेन्नईने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर संघाचा प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होनं एक विधान केलं, ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्यानं म्हटलं, "मुंबई इंडियन्सनं फायनलमध्ये पोहचू नये असं मला प्रामाणिकपणे वाटते. कारण त्यांनी अनेदका आम्हाला अंतिम फेरीत पराभूत केले आहे, त्यामुळं त्यांची भीती वाटते."
चेन्नई सुपर किंग्जने २०१० मध्ये मुंबईविरुद्ध विजय मिळवला होता. याशिवाय हेड-टू-हेडबद्दल भाष्य करायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये एकूण ३६ सामने झाले आहेत, त्यापैकी २० वेळा मुंबईने विजय मिळवला आहे. अशा स्थितीत ड्वेन ब्राव्होने मुंबईचा संघ आमच्या संघाची डोकेदुखी वाढवू शकतो असं म्हटलं आहे.