ms dhoni on ajinkya rahane । मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सवर (MI vs CSK) ७ गडी राखून विजय मिळवत यजमानांना पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर कॅप्टन कूल धोनीने (MS Dhoni) आपल्या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेकडून अजिंक्य रहाणेने स्फोटक खेळी करून संघाचा विजय सोपा केला. रहाणेने २७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली.
धोनीने दिला 'कानमंत्र'
दरम्यान, सामन्यानंतर कर्णधार धोनीने रहाणेच्या या खेळीबद्दल म्हटले, "आमच्या डावाची सुरूवात होण्याआधी मी रहाणेसोबत चर्चा केली होती. तेव्हा मी त्याला म्हटले होते की, तू तुझ्या क्षमतेनुसार खेळ, तुझ्या क्षमतेचा वापर करून क्षेत्ररक्षकांच्या मधून धावा काढण्यावर लक्ष दे." तसेच रहाणेला मी सांगितले होते की, तू तुझ्या खेळीचा आनंद घे, तणाव घेऊ नको. कदाचित तुला सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संधी मिळणार नाही पण जेव्हाही गरज भासेल तेव्हा मी तुझे समर्थन करेन. त्याने मोठे फटके मारले पण ज्या पद्धतीने तो बाद झाला त्यावर तो खुश नव्हता, असे धोनीने अधिक सांगितले.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरूवात खराब झाली होती. पहिल्याच षटकात दीपर चाहरला दुखापत झाली, तर पॉवरप्लेच्या ६ षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी ६१ धावा कुटल्या होत्या. मात्र, त्यानंतर चेन्नईच्या फिरकीपटूंनी कमाल करत जोरदार पुनरागमन केले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर तुषार देशपांडे आणि मिचेल सॅंटनर यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या होत्या.
चेन्नईचा सलग दुसरा विजय
१५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला पहिल्या षटकात डेव्होन कॉन्वेच्या रूपात पहिला झटका बसला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या घरच्या मैदानावर मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रहाणेने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याला ऋतुराज गायकवाडने सावध खेळी करून चांगली साथ दिली. अखेर चेन्नईच्या संघाने १८.१ षटकांत १५९ धावा करून सामना आपल्या नावावर केला. यासह धोनीच्या संघाने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Chennai Super Kings led by MS Dhoni beat Mumbai Indians by 7 wickets on the strength of Ajinkya Rahane's explosive innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.