इंडियन प्रीमिअर लीगनंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या फ्रँचायझी आणखी एका लीगमध्ये संघ खरेदी करणार आहेत. MI व CSK सह दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स या IPL 2022मधील फ्रँचायझी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही लीग होण्याची शक्यता आहे आणि यात सहा संघांचा समावेश असणार आहे. होम- अवे या फॉरमॅटमध्ये ३० सामने होतील आणि त्यानंतर प्ले ऑफच्या लढती खेळवण्यात येणार आहेत.
क्रिकेट दक्षिण आफ्रिका तिसऱ्यांदा फ्रँचायझी लीग आणण्याचे प्रयत्न करत आहे. यापूर्वी त्यांनी २०१७मध्ये ग्लोबल लीग ट्वेंटी-२० ( Global League T20 ) व २०१८-२०१९मध्ये मँझन्सी सुपर लीग ( Mzansi Super League ) खेळवली होती. पण, त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. पण, आता येऊ घातलेली लीग ही जगातील दुसरी सर्वोत्तम ट्वेंटी-२० लीग असेल असा दावा करण्यात येत आहेत. आयपीएलचे माजी chief operating officer सुंदर रमण यांचे आफ्रिकेतील लीगमध्ये १२.५% शेअर्स आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडे ५७% आणि ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्ट्सकडे ३०% शेअर्स आहेत.
क्रिकेट दक्षिण आफ्रिका या लीगसाठी पुढील दहा वर्षांकरीता ५६ मिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे आणि याचकालावधीत ३० मिलियन अमेरिकन डॉलरचा प्रॉफिट कमावण्याचा त्यांचा निर्धार आहे. दक्षिण आफ्रिकेत पुढील पाच वर्षांत आयसीसीच्या तीन स्पर्धा होणार आहेत.