Deepak Chahar and ben stokes । नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सवर (MI vs CSK) ७ गडी राखून विजय मिळवत यजमानांना पराभवाची धूळ चारली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेकडून अजिंक्य रहाणेने स्फोटक खेळी करून संघाचा विजय सोपा केला. रहाणेने २७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. चेन्नईने स्पर्धेत सलग दुसरा विजय साकारला पण संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे.
चेन्नईला दुखापतीचं ग्रहण
३० वर्षीय दीपक चाहरला मुंबईविरूद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली अन् तो संघाबाहेर झाला. खरं तर चाहर दुखापतीमुळे २०२२ च्या संपूर्ण हंगामाला मुकला होता. खरं तर यंदा देखील चाहर काही काळासाठी आयपीएलमधून बाहेर झाला आहे. याशिवाय बेन स्टोक्सच्या रूपात सीएसकेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, घोट्याच्या दुखापतीने महागडा खेळाडू बेन स्टोक्स आठवडाभर बाहेर राहण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली. अशातच तो १२ एप्रिलला होणाऱ्या राजस्थान विरूद्धच्या सामन्यात देखील खेळणार नाही. तसेच 17 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यातून स्टोक्स पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
काल झालेल्या मुंबई विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरूवात खराब झाली होती. पहिल्याच षटकात दीपर चाहरला दुखापत झाली, तर पॉवरप्लेच्या ६ षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी ६१ धावा कुटल्या होत्या. मात्र, त्यानंतर चेन्नईच्या फिरकीपटूंनी कमाल करत जोरदार पुनरागमन केले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर तुषार देशपांडे आणि मिचेल सॅंटनर यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या होत्या.
चेन्नईचा सलग दुसरा विजय
१५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला पहिल्या षटकात डेव्होन कॉन्वेच्या रूपात पहिला झटका बसला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या घरच्या मैदानावर मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रहाणेने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याला ऋतुराज गायकवाडने सावध खेळी करून चांगली साथ दिली. अखेर चेन्नईच्या संघाने १८.१ षटकांत १५९ धावा करून सामना आपल्या नावावर केला. यासह धोनीच्या संघाने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Chennai Super Kings player Deepak Chahar followed by all-rounder Ben Stokes Stokes out for a week in IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.