CSK vs GT Final : सोमवारी रवींद्र जडेजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी चौकार लगावून आयपीएलला सोळावा चॅम्पियन दिला. चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्यांना पराभूत करून आयपीएलवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासाच प्रथमच एवढ्या उशिरा सामना खेळवला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी होणारा सामना सोमवारी घेण्यात आला. पहिला डाव झाल्यानंतर सोमवारी देखील पावसाने बॅटिंग करण्यास सुरूवात केली आणि खेळाडूंना बाकावर बसावे लागले. अंतिम सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला काही खास कामगिरी करता आली नाही. पण त्यानं १६ चेंडूत २६ धावा करून साजेशी सुरूवात करून दिली.
फायनलच्या सामन्यात पावसाचे आगमन झाले अन् सामना रात्री उशिरापर्यंत चालला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. आयपीएल २०२३ चा संपूर्ण हंगाम महेंद्रसिंग धोनी या नावाभोवती राहिला. पण फायनलच्या सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मोहित शर्माने गतविजेत्यांना खुशखबर देताना सलग दोन चेंडूवर दोन बळी घेतले. धोनी पहिल्याच चेंडूवर मोहितचा शिकार झाला अन् स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली. पण रवींद्र जडेजा गुजरातसाठी काळ ठरला आणि त्यानं अखेरच्या २ चेंडूमध्ये १० धावा करत चेन्नईला चॅम्पियन केले.
ऋतुराजची पोस्ट चर्चेत
आपला संघ चॅम्पियन झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडनं पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या आहेत. "दीर्घ निद्रानाशाच्या रात्रीनंतर अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली असल्याची भावना जागृत झाली. अंतिम सामन्याला एवढा उशीर झाल्यानंतर आणि २ चेंडूत १० धावा करायच्या होत्या यावर विश्वासच बसत नव्हता. पण सर जडेजाने आमच्यासाठी जबाबदारी स्वीकारली. सर्व चाहत्यांचे आभार... ज्यांनी एवढा उशीर होऊनही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला पाठिंबा दर्शवला", अशा शब्दांत ऋतुराजने चाहत्यांचे आभार मानले.
चेन्नईचा 'पाचवा' पराक्रम
गुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर पराभूत करून धोनीच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब उंचावला. अखेरच्या षटकांतील शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने अनुभवाचे कौशल्य दाखवले. मोहित शर्माच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं चाहत्यांना जागं केलं. तर, अखेरचा चेंडू जड्डूच्या पायाला लागून सीमीरेषेकडं गेला अन् चेन्नईच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
Web Title: Chennai Super Kings player Ruturaj Gaikwad thanked the fans after winning IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.