- रोहित नाईक
मुंबई - यंदाच्या आयपीएलमध्ये ‘डीआरएस’ प्रणाली लागू होणार ही खूप चांगली बाब असून त्याचा सर्वाधिक फायदा आमच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला होईल. आज जागतिक क्रिकेटमध्ये डीआरएसद्वारे सर्वाधिक अचूक निर्णय मिळवणारा खेळाडू आमचा कर्णधार असल्याने त्याचा फायदा आम्हाला नक्कीच जास्त होईल,’ असे मत भारताचा स्टार फलंदाज केदार जाधव याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. सोमवारी मुंबईत सोलापूरच्या एका आघाडीच्या बँकेच्या शाखेचे उद्घाटन केदारच्या हस्ते झाले. सोमवारीच केदारने वयाची ३३ वर्षही पूर्ण केली. यावेळी त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. केदार म्हणाला की, ‘कर्णधार धोनीमुळे डीआरएसचा चेन्नई संघाला नक्कीच खूप फायदा होईल. शिवाय मी आतापर्यंत आयपीएल चषक उंचावलेला नाही आणि यंदा चेन्नईकडून खेळताना हे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कारण सध्याचा आमचा संघ खूप मजबूत आहे.’खेळातील आव्हानांविषयी केदारने सांगितले की, ‘आयपीएल किंवा टी२० क्रिकेट अवघड आहे. इथे सातत्य टिकवून ठेवणे खूपच आव्हानात्मक असतं. एक फलंदाज म्हणून सातत्याने धोकादायक फटके खेळावे लागतात. शिवाय मी ज्या क्रमांकावर फलंदाजीस येतो, तेथे सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळावे लागतात. कारण चेंडू कमी उरलेले असतात आणि संघाची धावसंख्या वाढवायची असते, त्यामुळे स्थिरावण्याची संधी कमी असते. यामुळे टी२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अनेकदा अपयश येत असतं. पण ज्या कोणत्या सामन्यात मी खेळेल तो सामना संघासाठी जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल.’ आज भारतीय संघात स्थान भक्कम करण्यासाठी मोठी स्पर्धा असून याविषयी केदार म्हणाला की, ‘सध्या मी दुखापतींमुळे संघाबाहेर आहे. संघ व्यवस्थापनाला माझे स्थान संघातील माहित आहे. मी सातव्या क्रमांकावर खेळायला येतो आणि हे स्थान अत्यंत अवघड असल्याचीही जाणीव त्यांना आहे. त्यामुळे जे कोणी नवीन खेळाडू संघात येत आहेत, ते माझ्या स्थानी न खेळता वरच्या क्रमांकावर खेळतात. त्याशिवाय मी गोलंदाजीही करत असल्याने त्याचाही मला फायदा होतो. थोडक्यात जोपर्यंत मी तंदुरुस्त राहिन तोपर्यंत मी भारतासाठी नक्की खेळत राहणार.’ आयपीएलमध्ये सर्वच खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहित असतो. ही बाब खूप आव्हानात्मक असली, तरी हीच या स्पर्धेची गंमत आहे. यामुळे, प्रत्येक दिवशी वेगळे आव्हान मिळते आणि जो त्या दिवशी चांगला खेळतो तोच बाजी मारतो. विशेष म्हणजे यामुळेच क्रिकेट यशस्वी आहे. इतकी वर्ष एकमेकांसह खेळल्यानंतरही नेहमी नवीन शिकण्यास मिळते. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळत आहेत.- केदार जाधव चेंडू छेडछाडीविषयी माहिती नाही...दक्षिण आफ्रिका वि. आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेत झालेल्या चेंडू छेडछाडीविषयी विचारले असता केदार म्हणाला, ‘अद्याप मला या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही. माझ्या पुण्यातील प्रशिक्षकांकडून मला याविषयी माहिती मिळाली. शिवाय मी फारसा वृत्तवाहिन्या बघत नाही किंवा वृत्तपत्रेही वाचत नाही. त्यामुळे पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय यावर काहीही बोलणं योग्य नाही. शिवाय नकारात्मक गोष्टींवर चर्चा करणे मला आवडत नाही.’