इंडियन प्रीमिअर लीग २०२४ अंतिम टप्प्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर १ जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर २ सामना होणार आहेत. हे दोन्ही सामने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहेत. २४ मे रोजी क्वालिफायर २ चा सामना होईल आणि त्यानंतर २६ मे रोजी फायनल होईल. पण, या दोन्ही सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. पावसामुळे दोन्ही सामने रद्द करावे लागल्यास, जेतेपदाची ट्रॉफी कोण जिंकेल, हा प्रश्न आता फॅन्सना सतावतोय...
कोलकाता नाईट रायडर्सने २० गुणांसह क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की केली आणि त्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून फायनल गाठली. SRH आणि RR यांचे प्रत्येकी १७ गुण होते, परंतु हैदराबादने सरस नेट रन रेटच्या जोरावर क्वालिफायर १ मध्ये स्थान पटकावले. त्यांचा पराभव झाला, परंतु त्यांच्याकडे क्वालिफायर २ मध्ये खेळून दुसरी संधी आहे. एलिमिनेटरमध्ये राजस्थानने RCB वर विजय मिळवून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे.
SRH vs RR यांच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि शुक्रवारी सामना होऊ शकला नाही, तर शनिवारचा राखीव दिवस या सामन्यासाठी मिळतोय. चला समजूया की राखीव दिवसातही सामना झाला नाही, तर SRH फायनलसाठी पात्र ठरतील. कारण, गुणतालिकेत त्यांनी दुसरे स्थान पटकावले होते आणि ते RR च्या पुढे होते. तसंच जर फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आला, तर राखीव दिवस आहे. राखीव दिवशीही मॅच न झाल्यास KKR ला विजयी घोषित केले जाईल.
IMD नुसार, तामिळनाडूसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडेल. चेन्नईत आयपीएल क्वालिफायर २ आणि फायनल खेळवली जाणार आहे. पण, हवामान खात्याने हे देखील सांगितले आहे की, चेन्नईमध्ये फक्त हलका, तुरळक पाऊस पडू शकतो.
आयपीएल २०२३ची फायनल आठवा...आयपीएल २०२३ मध्ये पावसाचा व्यत्यय आला होता आणि तीन दिवस हा सामना सुरू होता. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सा DLS नुसार ५ धावांनी पराभव केला होता.