अयाझ मेमन
चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना अप्रतिम झाला. या वेळी चेन्नईचे पाठीराखे मोठ्या संख्येने दिसून आले. पण ते खूप निराश दिसत होते. मात्र त्यांची निराशा अखेरच्या तीन षटकांमध्ये दूर झाली. सामन्याची स्थिती पाहून असे वाटत होते की, कदाचित चेन्नईला या वेळी पराभव पत्करावा लागेल. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत चेन्नईने हैदराबादला १३९ धावांमध्ये रोखले. जर हैदराबादचा कार्लोस ब्रेथवेट अखेरच्या काही षटकांमध्ये आक्रमक पद्धतीने खेळला नसता, तर हैदराबादची धावसंख्या ११५-१२० धावांच्या आसपास रोखली गेली असती. विश्वचषक टी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ब्रेथवेटची स्वप्नवत खेळी सर्वच क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे आणि त्याच प्रकारची खेळी ब्रेथवेटने या वेळीही केली.
ब्रेथवेटमुळे हैदराबादला समाधानकारक मजल मारण्यात यश आले. यानंतर हैदराबादच्या बलाढ्य गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजीला मोठी गळतीच लागली. त्यामुळे असेही चित्र निर्माण झाले होते की, अत्यंत मजबूत फलंदाजी असलेला चेन्नईचा संघ शंभरच्या आतमध्येच गडगडेल. निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा चेन्नईला कोणताही मार्ग दिसत नव्हता. राशिद खानने चार षटकांत ११ धावा देत २ महत्त्वपूर्ण बळी मिळवले. सिद्धार्थ कौलने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याशिवाय, भुवनेश्वर कुमारने आपल्या सुरुवातीच्या ३ षटकांमध्ये काहीच धावा दिल्या नव्हत्या.
त्यामुळे हा सामना चेन्नई मोठ्या फरकाने गमावणार असेच दिसत होते. मात्र, एकमेव फलंदाज खंबीरपणे टिकून होता आणि तो म्हणजे फाफ डूप्लेसिस. दक्षिण आफ्रिकेच्या या कर्णधाराने यंदाच्या सत्रात खूप कमी सामने खेळले आणि फारशी चमक पाडली नव्हती. पण या सामन्यात तो सलामीला आला होता आणि अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने संघाला विजयी केले. डूप्लेसिसने एक अशी जबरदस्त खेळी केली, की ज्याच्या जोरावर त्याने हैदराबादकडून सामना अक्षरश: हिसकावून घेतला. त्याचवेळी चेन्नईला नशिबाचीही साथ मिळाली. कौलच्या षटकात शार्दुल ठाकूरला याच नशिबाच्या जोरावर दोन निर्णायक चौकारही मिळाले.
माझ्या मते जर कर्णधार केन विलियम्सने भुवनेश्वर कुमारला १९वे षटक दिले असते, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळाही लागला असता. अर्थात ही झाली जर - तरची गोष्ट. असो. येथे दाद द्यावी लागेल ती चेन्नईला. त्यांनी कधीही सामन्यात हार मानली नाही. अखेरपर्यंत त्यांनी आपल्या विजयाच्या आशा सोडल्या नाहीत. आयपीएलचे त्यांनी ९ सत्रे खेळली असून प्रत्येकवेळी ते प्ले आॅफमध्ये खेळले आहेत; शिवाय ७ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्याचवेळी, त्यांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी यंदा अंतिम फेरी खेळण्याची आठवी वेळ असेल. याआधी त्याने गतवर्षी रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून अंतिम फेरी गाठली होती. ज्या प्रकारे धोनीचे आयपीएल आणि चेन्नई सुपरकिंग्जसाठी योगदान राहिले आहे, माझ्या मते ती कामगिरी एक आत्मकथा बनली आहे.
Web Title: Chennai's batting line-up needs to be appreciated
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.