मुंबई : प्रथम मानांकित व्हेनेझुएलाचा ग्रँडमास्टर ईतूरिझगा बोनेलीचा (इलो २६३७) तामिळनाडूच्या व्ही एस राहुलने (इलो २२९२ ) ४९ चालीत पराभव करून १२ व्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय मानांकन अ विभाग बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या साखळी सामन्यात खळबळजनक विजयाची नोंद केली.मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटना आणि व्हिनस चेस अकॅडेमी आयोजित स्पर्धेमध्ये ५३ व्या क्रमवारीत असलेल्या राहुलच्या पराक्रमामुळे दोन्ही साखळी सामने जिंकणारा द्वितीय मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर फारुख अमोनाटोव्हला (इलो २६२४) तिसऱ्या साखळी सामन्यात पाहिल्यावर पटावर बढती मिळेल.
माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कुलचे सभागृह, बीकेसी-मुंबई येथे पहिल्या पटावर व्ही. एस. राहुलने पांढऱ्या मोहरांनी प्रथम मानांकित इतुररिझगा विरुद्ध खेळतांना इंग्लिश पध्दतीने डावाची सुरवात केली. १४ व्या चालिला वजीरा वजिरी करत डावावर पकड मिळविली. नंतर १९ व्या चालीत एक प्यादा मिळवून आपला डाव अधिक मजबुत केला. नंतर ३० व्या चालीत अजून एक प्यादा मिळवून उंट आणि घोडा यांच्या बदल्यात २ उंट अशा परिस्थितीत आपला एक प्यादा शेवटच्या घराकडे कूच करत नेला. यातून सुटण्याचा काहीही मार्ग न सापडल्यामुळे अव्वल मानांकितइतुररिझगाने ४९ व्या चालीला पराभव मान्य केला.
बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत आणि माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कुल नॉलेज संस्थेच्या सहकार्याने सुरु असलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या पटावर ताजिकिस्तानचा ग्रँड मास्टर फारुख अमोनाटोव्हने (इलो २६२४) फिडे मास्टर सुयोग वाघचा (इलो २२५० ) पराभव करून दुसरा साखळी गुण वसूल केला. तिसऱ्या पटावर जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पँटसुलिया लेव्हानने (इलो २६१४) आंध्र प्रदेशच्या भरत कुमार रेड्डीवर (इलो २२७०) तर चौथ्या पटावर आर्मेनियाचा ग्रँड मास्टर तेर-सहक्यान सॅमवेलने (इलो २६११) अमेरिकेचा ग्रँड मास्टर झीयात्दिनोव्ह रसेटवर (इलो २२४९) विजय मिळवून सलग दुसरा साखळी सामना जिंकला.