राजस्थान रॉयल्सचा युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याचे वडील कांजीभाई यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर त्यांचा लढा अयशस्वी ठरला आहे. कांजीभाई यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं.
आयपीएलमध्ये चेतन सकारिया यानं आपल्या चमकदार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आली. स्पर्धा थांबल्यानंतर चेतन घरी परतण्याऐवजी थेट रुग्णालयात गेला होता. आयपीएलमधून कमावलेल्या पैशातून चेतन त्याच्या वडिलांवर उपचार करत होता.
दुर्दैवी बाब अशी की चेतन सकारियासाठी गेल्या दोन-तीन महिन्यातील हा दुसरा धक्का आहे. जानेवारी महिन्यात जेव्हा चेतन सकारिया सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळत होता. तेव्हा त्याच्या लहान भावानं आत्महत्या केली होती. त्यानंतर आता चेतननं वडिलांनाही गमावलं आहे.
चेतननं गेल्या आठवड्यात वडिलांच्या प्रकृतीबाबत सांगितले होते आणि आयपीएल २०२१मधून मिळालेला पगार त्यानं त्वरित घरी पाठवला होता. घरी परतल्यानंतर तो सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हॉस्पिटलच्या बाकावरच बसून होता. त्याच्या वडिलांना मधुमेहाची समस्या आहे आणि आता कोरोना झाल्यानं तो चिंतीत आहे. ''काही दिवसांपूर्वी मला राजस्थान रॉयल्सकडून पगार मिळाला होता आणि तो मी लगेच घरी ट्रान्सफर केला. त्यानं या कठीण काळात माझ्या कुटुंबीयांना मदत झाली,''असे चेतननं Indian Expressशी बोलताना सांगितले होते.