नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याचे वडील कांजीभाई यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी त्यांना इस्पितळात हलविण्यात आले आहे. सकारिया घरी परतण्याऐवजी थेट इस्पितळात गेला. आयपीएलमध्ये कमविलेल्या पैशातून तो वडिलांवर उपचार करीत आहे.
तो म्हणाला, ‘काहीच दिवसांआधी मला रॉयल्सने पैसे दिले. मी ते घरी पाठविल्यामुळे वडिलांच्या उपचारास मदत होऊ शकली. आठवडाभरापूर्वी वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. आयपीएल झाले नसते तर वडिलांच्या उपचारासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागली असती.’‘लोक म्हणतात,आयपीएल बंद करा, मात्र मी काही बोलू इच्छितो. मी कुटुंबात एकमेव कमावता आहे. क्रिकेट हे माझ्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. आयपीएलमधून मिळालेल्या पैशातूनच मी वडिलांना सर्वोत्तम सुविधा पुरवू शकलो. ही लीग एक महिना झाली नसती तर माझ्यासाठी फारच अडचणीचे ठरले असते. आमचे कुटुंब गरीब आहे. वडिलांनी टेम्पो चालवला. आता आयपीएलमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली,’असे मत चेतनने व्यक्त केले आहे.