जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी ( WTC Final) भारताला धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर यांच्यानंतर लोकेश राहुल ( KL Rahul) यालाही WTC Final मधून माघार घ्यावी लागली आहे. आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना लोकेशला दुखापत झाली आणि माघार घेत असल्याचे त्याने आज जाहीर केले. त्यामुळे भारताची फलंदाजाची फळी कमकुवत झाल्याचे दिसत आहे. पण, मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) WTC Final च्या तयारीसाठी आधीच लंडनमध्ये पोहोचला आहे आणि त्याचा सातत्यपूर्ण खेळ पाहून ऑस्ट्रेलियाचा धडकी भरली आहे.
ससेक्स क्लबकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने कौंटी क्रिकेटमध्ये याआधीच्या सामन्यात १५१ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला होता. आजही त्याने Worcestershire क्लबविरुद्ध दमदार खेळी केली आहे. वॉर्सेस्टरशायर क्लबने पहिल्या डावात २६४ धावा केल्या. एडम होजे ( ५९), मॅथ्यू वेट ( ५९), जोए लिच ( ५३) आणि गॅरेथ रॉडेरिक ( ३९) यांनी चांगला खेळ करताना ससेक्सच्या गोलंदाजांना कडवी टक्कर दिली. ऑली रॉबिन्सनने ५९ धावांत ७ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, ससेक्सच्या अली ओर ( ३४), टॉम क्लार्क ( १२) व टॉम अल्सोप ( १३) हे माघारी परतल्यानंतर कर्णधार चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव्ह स्मिथसोबत डाव सावरला.
या दोघांनी ६१ धावांची भागीदारी केली. स्मिथ ३० धावांवर बाद झाला आणि पाठोपाठ जेम्स कोलेस ( १४) हाही मोठी खेळी न करता माघारी परतला. पण, पुजारा खिंड लढवतोय आणि त्याने १०६ चेंडूंत नाबाद ६७ धावा करताना संघाला ५ बाद २१२ धावांपर्यंत नेले आहे. पावसामुळे खेळ थांबला आहे.
दरम्यान, पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९ हजार धावांचा टप्पा ओलांडला आणि भारताकडून अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला. सुनील गावस्कर ( २५८३४), सचिन तेंडुलकर ( २५३९६), राहुल द्रविड ( २३७९४), व्ही व्ही एस लक्ष्मण ( १९७३०) व वासीम जाफर ( १९४१०) यांनी हा पराक्रम केला आहे. पुजाराच्या नावावर १९०४३* धावा आहेत.