इंदूर : इंडियन प्रीमिअर लीगसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत संघ मालकांनी नाकारलेल्या चेतेश्वर पुजाराने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत खणखणीत शतक ठोकलं. कसोटीपटू असा स्टॅम पाठीशी लागल्यामुळे पुजाराला एकाही आयपीएल संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले नाही. पण, त्याने गुरुवारी 61 चेंडूंत नाबाद 100 धावा चोपून आयपीएल मालकांना जणू चपराकच मारली. सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना पुजाराने रेल्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
पुजाराला आयपीएलमध्ये 30 सामन्यांत 20.52 च्या सरासरीनं 390 धावा करता आल्या होत्या. त्यात 51 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. पण, 2014 नंतर त्याला आयपीएलपासून दूर ठेवण्याचाच पवित्रा संघ मालकांनी घेतला. त्यामुळे पुजारा या झटपट क्रिकेट फॉरमॅटपासून दूरावला होता. त्याने सर्व लक्ष्य कसोटीकडे केंद्रीत करताना भारतीय संघासाठी बहुमुल्य योगदान दिले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पुजाराची बॅट चांगलीच तळपली होती. इंग्लंड दौऱ्यातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती, परंतु रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो अपयशी ठरला आणि विदर्भने जेतेपदाला गवसणी घातली.
सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेतील क गटाच्या पहिल्याच सामन्यात त्याने जोरदार फटकेबाजी केली. रेल्वेनं नाणेफेक जिंकून सौराष्ट्रला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. हार्विक देसाई आणि पुजारा यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. देसाई बाद झाल्यानंतर पुजारा व रॉबीन उथप्पा यांनी रेल्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 82 धावा जोडल्या. उथप्पानं 31 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 46 धावा केल्या. पुजाराने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवताना 1 षटकार व 14 चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने 3 बाद 188 धावांचा डोंगर उभा केला.
पुजारानं यासह आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 300+, लिस्ट A क्रिकेटमध्ये 150+ आणि ट्वेंटी-20त 100+ धावा अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. याआधी वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल यांनी ही कामगिरी केली आहे. पण, भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 300+, लिस्ट A क्रिकेटमध्ये 150+ आणि ट्वेंटी-20त 100+ धावा अशी कामगिरी करणारा पुजारा हा अग्रवालनंतर पहिलाच खेळाडू ठरला.