हार्दिक पंड्यापेक्षा चेतेश्वर पुजारा का सरस ठरतो, ते जाणून घ्या

पहिला कसोटी सामना तुम्हाला आठवतोय का, हो तोच, भारत जिंकता जिंकता हरलेला. हा सामना कुणामुळे हरलो तर याचे मुख्य कारण पंड्या, असे म्हणता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 04:05 PM2018-09-01T16:05:43+5:302018-09-01T16:06:08+5:30

whatsapp join usJoin us
Cheteshwar Pujara is better than hardik pandya | हार्दिक पंड्यापेक्षा चेतेश्वर पुजारा का सरस ठरतो, ते जाणून घ्या

हार्दिक पंड्यापेक्षा चेतेश्वर पुजारा का सरस ठरतो, ते जाणून घ्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देहार्दिक पंड्या त्यांना कपिल देव वाटतो, तर चेतेश्वर पुजाराची फलंदाजी ते सोयीस्कररीत्या टाळतात.

प्रसाद लाड
सध्याची पिढी ट्वेन्टी-20च्या मुशीत वाढलेली. त्यांना धावा महत्त्वाच्या वाटतात, फलंदाजाच्या क्लासशी त्यांचे घेणेदेणे नाही. बॅटचा एज लागून जरी चेंडू सीमारेषेपार गेला तरी त्यांना त्याचे कौतुक. पण एखाद्या चेंडूवर चांगला बचाव केला, तर त्याचं त्यांना सोयरसुतकही नसतं. हार्दिक पंड्या त्यांना कपिल देव वाटतो, तर चेतेश्वर पुजाराची फलंदाजी ते सोयीस्कररीत्या टाळतात. पण कसोटी क्रिकेटमध्ये हार्दिकपेक्षा पुजाराच सरस ठरताना दिसतो.

पंडयापेक्षा पुजारा सरस का, हे पाहण्यासाठी फार आठवण्याची गरज नाही. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचाच आपण विचार करू. पहिला कसोटी सामना तुम्हाला आठवतोय का, हो तोच, भारत जिंकता जिंकता हरलेला. हा सामना कुणामुळे हरलो तर याचे मुख्य कारण पंड्या, असे म्हणता येईल.

पहिला कसोटी सामना भारताला 31 धावांनी गमवावा लागला. दुसऱ्या डावात भारतीय संघ 194 धावांचा पाठलाग करत होता. भारताचा कर्णधआर विराट कोहली शड्डू ठोकून खेळपट्टीवर उभा होता. कोहलीने 51 धावांची खेळी साकारली. बेन स्टोक्सचा एक चेंडू सरळ त्याच्या पॅडवर आदळला आणि तो बाद झाला. तेव्हा भारताला भारताला विजयासाठी 53 धावा हव्या होत्या. पंड्याबरोबर फलंदाजीला असणार होते, तीन तळाचे फलंदाज. 

क्रिकेट खेळणाऱ्या गल्लीतल्या मुलालाही एक गोष्ट माहिती आहे. जेव्हा तळाचे फलंदाज खेळायला येतात तेव्हा खेळपट्टीवर असलेल्या खेळाडूने जास्त चेंडू खेळायचे असतात. खेळपट्टीवर पंड्या होता, त्याने अधिक चेंडू खेळून षटकातील पाचव्या किंवा सहाव्या चेंडूवर धाव घ्यायला हवी होती. पण हा कॉमन सेन्स पंड्यासारख्या ट्वेन्टी-20च्या मुशीत वाढलेल्या खेळाडूकडे नव्हता. पंड्या पहिल्या किंवा दुसऱ्याच चेंडूवर एकेरी धाव घ्यायचा. त्यानंतरचे चेंडू खेळताना तळाचे फलंदाज चाचपडत होते. या साऱ्याची परिणीती भारताच्या पराभवामध्ये झाली.

आता पुजाराची गोष्ट बघा. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यातील भारताचा पहिला डाव. भारताने 189 धावांवर आपले सर्व बिनीचे फलंदाज गमावले होते. त्यानंतर अश्विनही सहा धावांत तंबूत परतला. पुन्हा एकदा जवळपास तशीच परिस्थिती. तळाचे तीन फलंदाज शिल्लक होते. तिन्ही वेगवान गोलंदाज. पण पुजारा हा फक्त तंत्रशुद्ध फलंदाज नाही, तर त्याला क्रिकेटची किती जाण आहे, हे त्याच्या या खेळीतून दिसून आले. प्रत्येक षटकातील 4-5 चेंडू तो स्वत: खेळायचा. त्यामध्ये एखादी दुहेरी धाव किंवा चौकार वसूल करण्याचा प्रयत्न असायचा. या आपल्या रणनीतीमध्ये त्याने सातत्य राखले आणि तळाच्या दोन फलंदाजांना घेऊन भारताच्या धावसंख्येत 78 धावांची भर घातली. त्याचबरोबर आपले शतकही पूर्ण केले.

एखादा क्रिकेटपटू किती स्थानिक सामने खेळतो, यावर तो काय करू शकतो हे अवलंबून असते. फक्त एखाद्या डावात चांगली कामगिरी करून भागत नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करणं हे महत्त्वाचं असतं. पंड्या आणि पुजारा यांच्यामध्ये नेमका हाच फरक आहे. कारण पुजाराने स्थानिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी उभारल्या होत्या. दुसरीकडे पंड्या किती स्थानिक क्रिकेट खेळला आहे, हे पाहिल्यावर या दोन्ही क्रिकेटपटूंमधला फरक तुम्हाला कळी शकतो.

Web Title: Cheteshwar Pujara is better than hardik pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.