Join us  

चेतेश्वर पुजाराने गाठला 4000 धावांचा टप्पा 

श्रीलंकेविरोधातील दुस-या कसोटी सामन्यात खेळणारा भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आपल्या कसोटी कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना खेळत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 3:17 PM

Open in App

कोलंबो, दि. 3 - श्रीलंकेविरोधातील दुस-या कसोटी सामन्यात खेळणारा भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आपल्या कसोटी कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना खेळत आहेत. कसोटी सामन्याचं अर्धशतक पुर्ण करत असताना चेतेश्वर पुजाराने चार हजार धावांचा टप्पा पुर्ण केला आहे. गुरुवारी चेतेश्वर पुजारा मैदानात खेळण्यासाठी उतरला तेव्हा त्याला चार हजार धावा पुर्ण करण्यासाठी फक्त 34 धावांची गरज होती. पुजाराने 98 चेंडूंचा सामना करताना 34 धावा पुर्ण केल्या आणि चार हजार धावांच्या क्लबमध्ये एंट्री केली. पुजाराने 84 डावांमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला आहे. 

चेतेश्वर पुजारा आणि राहुल द्रविडच्या चार हजार धावा पुर्ण करण्यामध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे राहुल द्रविडने आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत 84 डावांमध्येच चार हजार धावा पुर्ण केल्या होत्या. 

भारताची धावसंख्या 56 वर असताना शिखर धवन बाद झाला. 35 धावांवर असताना दिलरुवान परेराने शिखर धवनला पायचीत करत माघारी धाडलं. शिखर धवन बाद झाल्याने चेतेश्वर पुजाराला फलंदाजी संधी मिळाली. 11 व्या ओव्हरमध्येच चेतेश्वर पुजारा आपला 50 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, आणि चार हजार धावांचा टप्पा पुर्ण केला. 

राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारापेक्षाही जलदगतीने चार हजार धावा पुर्ण करण्याचा रेकॉर्ड विरेंद्र सेहवाग आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. विरेंद्र सेहवागने 79 तर सुनील गावस्कर यांनी 81 डावांमध्ये हा रेकॉर्ड केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे विरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर दोघेही ओपनर फलंदाज होते, तर राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांना जास्तवेळा तिस-या क्रमांकावर फंलदाजी करण्याची संधी मिळाली आहे. 

श्रीलंके विरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यातही टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये असून, चहानपानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 58 षटकात तीन बाद 238 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पूजारा आणि अजिंक्य रहाणेची जोडी खेळपट्टीवर असून, पूजाराने अर्धशतक फटकावले आहे. दोघांमध्ये नाबाद शतकी भागादारी झाली आहे. 

लोकेश राहुलने दमदार पुनरागमन करताना अर्धशतकी खेळी केली. तो (57) धावांवर धावबाद झाला. कर्णधार विराट कोहलीला आज सूर गवसला नाही. त्याला हेराथने मॅथ्यूजकरवी झेलबाद केले. सलामीवीर शिखर धवन (35) धावांवर बाद झाला. त्याला परेराने पायचीत केले. शिखर धवन आणि लोकेश राहुलने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली होती.

लोकेश राहुल फीट झाल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असून, सलामीवीर अभिनव मुकुंदला वगळण्यात आले आहे. पहिल्या कसोटीत अभिनव मुकुंद पहिल्या डावात अपयशी ठरला होता.पण दुस-या डावात त्याने अर्धशतकी खेळी केली होती.