Cheteshwar Pujara creates history: भारताचा संयमी फलंदाज चेतेश्वर पुजारा याला ससेक्स संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर, पहिल्याच सामन्यात त्याने धडाकेबाज कामगिरी केली. चेतेश्वर पुजाराने ससेक्सकडून खेळताना सुरूवातील दमदार शतक झळकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्यानंतर आज आपला शानदार फॉर्म कायम ठेवत बुधवारी मिडलसेक्स विरुद्धच्या काउंटी क्रिकेट सामन्यात त्याने द्विशतक झळकावले आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले. पुजाराने द्विशतक झळकावत एक मोठा इतिहास रचला.
दुहेरी शतक अन् विक्रमाचा डबल धमाका
चेतेश्वर पुजाराने ४०३ चेंडूंचा सामना करत २३१ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत २१ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. चेतेश्वर पुजाराने धडाकेबाज फलंदाजी केली. कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना त्याने क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर द्विशतक ठोकले. कौंटी क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर द्विशतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा मान चेतेश्वर पुजाराने पटकावला. तसेच, तब्बल ११८ वर्षांनंतर ससेक्स कडून एकाच कौंटी हंगामात तीन द्विशतक ठोकण्याचा भीमपराक्रम देखील चेतेश्वर पुजाराने करून दाखवला.
पुजाराने काल आपले शतक पूर्ण केले होते. त्यानंतर सकाळी ११५ धावांवरून त्याने पुढे खेळायला सुरुवात केली आणि लंचपर्यंत तो २६३ चेंडूत १४३ धावांवर पोहोचला. लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ससेक्सने उपाहारापर्यंत सहा विकेट गमावत ४१२ धावा केल्या. त्यानंतर पुजाराने दमदार फटकेबाजी सुरूच ठेवली. द्विशतकी खेळी करत त्याने संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. टॉम असलोपने (१३५) त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे ससेक्सने पहिल्या डावात ५२३ धावांचा डोंगर उभारला.